मुंबईत विनयभंगाच्या एका प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना १०० दिवस लागले. मात्र त्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपपत्र दाखल करून पुरावे सादर केल्याने न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत एका अनोळखी व्यक्तीने अश्लील वर्तन करून पळ काढला होता. या विद्यार्थिनीने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. परंतु या व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता किंवा या व्यक्तीचे कुठलेही वर्णन नव्हते, तसेच घटनास्थळी कुठेही सीसीटीव्ही नसल्यामुळे या व्यक्तीचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा हा प्रश्न पोलिसांना पडला होता.
परंतु पोलिसांनी माघार न घेता तपास सुरूच ठेवला होता. गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना संशयित इसम दिसून आला आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. अखेर १०० दिवसांनी पोलिसांना हा संशयित सापडला. पोलिसांनी तक्रारदाराला बोलावून त्या व्यक्तीला दाखवून खात्री करून घेतली असता ही तीच व्यक्ती असल्याचे तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले. गावदेवी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कामकाज केवळ १०२ दिवसात पूर्ण; पोलिसांचे कौतुक
गावदेवी पोलिसांनी २४ तासातच सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब नोंदवून ४८ तासात आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर कले. न्यायालयाने हा खटला तात्काळ निकाली काढत दोन दिवसात आरोपीला दोषी ठरवून आरोपीला ६ महिन्याची साध्या कैदेची शिक्षा आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या सर्व गुन्ह्याचे कामकाज केवळ १०२ दिवसात पूर्ण करून आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community