हरवलेल्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचा ‘स्पेशल ड्राईव्ह’!

92

हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एका महिन्याचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवण्यात येणार आहे. यामध्ये हरवलेल्या १८ वर्षांखालील मुले-मुलींचा, तसेच १८ वय वर्षांपेक्षा अधिक महिला व पुरुषांचा शोध या स्पेशल ड्राईव्ह प्रकल्पामध्ये घेण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यातून, हा स्पेशल ड्राईव्ह १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत राबवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी पत्रकातून दिले आहेत. या स्पेशल ड्राईव्हसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातून दोन अधिकारी आणि ४ पोलिस अंमलदार याची निवड केली जाणार असून नोडल अधिकारी म्हणून पोलिस ठाण्यातील, पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहे.

( हेही वाचा : पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा? मनसेचा व्यापाऱ्यांना सूचक इशारा )

१४० लहान मुले बेपत्ता

मुंबईत दररोज हरवलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यात १८ वर्षांखालील मुले-मुली तसेच १८ वर्षांपेक्षा अधिक मैल पुरुषांचा समावेश असून त्यात लहान मुले हरवल्याची संख्या मोठी आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या वर्षात शहरातील विविध भागातून सुमारे ९९९ लहान मुले हरवल्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्यापैकी ८५९ मुलांचा शोध लागला आहे. त्यांना त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही १४० मुले बेपत्ता आहेत. मुले हरवल्याची ११ महिन्यांची आकडेवारी पहाता मुंबईतून दररोज ३ ते ४ मुले हरवत आहेत. ही मुले असामाजिक घटकाच्या हाती लागू नये, म्हणून पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येते.

( हेही वाचा : अखेर नितेश राणे समोर आलेच.. )

स्पेशल ड्राईव्ह

त्याच प्रमाणे महिला व पुरुष यांचे हरवल्याचे प्रमाण मोठे असून यात घरातून रागातून निघून जाणे, स्मृतीभ्रंश, मनोरुग्ण, वयोवृद्ध यांचे प्रमाण अधिक आहे. हरवलेल्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडे ‘मिसिंग ब्युरो’ ही यंत्रणा असली तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्पेशल ड्राईव्ह सुरु केला आहे. १५ जानेवारीपासून हा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार असून हा ड्राईव्ह १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना हा स्पेशल ड्राईव्ह राबवण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये पोलिस उपनिरिक्षक आणि सहाय्यक पोलिस उपनिरक्षक दर्जाचे दोन अधिकारी आणि ४ पोलिस अंमलदार असतील. यात दोन महिला पोलिस अंमलदाराचा समावेश असेल. या पथकाला हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालये, शवगृहे, महिला पुरुष आश्रम, बालगृहे, तुरुंग, बेगर्स होम, रेल्वे स्थानके, एसटी आगार इत्यादी ठिकाणी पायपीट करावी लागणार आहे. हरवलेल्यांना शोधण्यासाठी काय केले याचा अहवाल दररोज पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (नोडल अधिकारी) यांना द्यावी लागणार आहे. एका महिन्यांनी हा अहवाल संबंधित पोलिस उपायुक्त यांना सादर करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.