राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचा-यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. विरोधकच नाही तर सत्ताधारी सुद्धा हे पोलिस यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हणत आहेत.
या घटनेचं सगळं खापर आता मुंबई पोलिसांवर फोडण्यात येत असून, बेजबाबदार पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पण हा यंत्रणेचा बेजबाबदारपणा आहे, की याला सरकारच जबाबदार आहे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. पोलिस खात्यातील काही खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या व्यथा समोर येत आहेत.
(हेही वाचाः ‘सिल्व्हर ओक’ वरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांना होती पूर्वकल्पना!)
मुंबई पोलिसांचे हाल
पोलिस कर्मचा-यांवर असलेल्या जबाबदारीच्या अतिरिक्त ओझ्यामुळे पोलिस त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात अनेक पोलिस कर्मचा-यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आधीच पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे. तसेच या काळात पोलिसांना अहोरात्र बंदोबस्त करावा लागत होता. त्यात 2017 नंतर पोलिस दलात आजतागायत भरती झालेली नाही. इतकंच नाही तर शेवटच्या भरती प्रक्रियेत निवड झालेले 250 ड्रायव्हर आणि 1000 अंमलदार हे आजही पोलिस प्रशिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाअभावी या पोलिसांना प्रत्यक्ष सेवा देता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अपु-या मनुष्यबळाचा ताण
आधीच अशाप्रकारे पोलिस यंत्रणेवर अपु-या मनुष्यबळाचा ताण आहे. त्यामुळे 8 तासांऐवजी पोलिसांना तासन् तास काम करावं लागत आहे. इतकंच नाही तर त्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. आता कुठे पोलिसांना कोविड बंदोबस्तातून जराशी मोकळीक मिळत होती, तर त्यात आता आयपीएलचे सामने, राम नवमी, रमझान ईदच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
(हेही वाचाः सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी)
लक्ष देण्याऐवजी पोलिसांनाच केले लक्ष्य
पोलिसांच्या या दयनीय अवस्थेकडे लक्ष न देता सरकार राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेवरुन पोलिसांना लक्ष्य करत आहेत. रक्षकांचंच रक्षण करण्याची वेळ आली असताना त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई वाचवण्यासोबतच स्वतःची नोकरी वाचवण्याचं मोठं आवाहन सुद्धा आपल्यासमोर असल्याची व्यथा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी पोलिस यंत्रणेच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी संजय पांडे यांना केला आहे. तसेच बेजबाबदार पोलिस अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
(हेही वाचाः हल्ल्याआधी मिटींग, नागपूरहून आला फोन…सदावर्तेंबाबत न्यायालयात धक्कादायक खुलासे)
आधीच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस अधिकारी सचिन वाझे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यात आता राज्यकर्त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पोलिसांनाच बदनाम केले जात असल्याची भावना आता प्रामाणिक पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community