सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई पोलिसांकडून समन्स

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.

फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर रोजी जैस्वाल यांना मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. यापूर्वी या प्रकरणात जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आले होते.

फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी

पोलिस अधिकारी यांच्या बदली संदर्भात राज्याच्या गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते, हा फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल लीक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. हा फोन टॅपिंगचा प्रकार घडला त्या वेळी सुबोध जैस्वाल हे राज्याचे पोलिस महासंचालक होते. या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालकांना सांगण्यात आले होते का? फोन टॅपिंग हे बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.

(हेही वाचा : नवाब मलिकांना सनसनाटी निर्माण करून कुणाला वाचवायचे?)

१४ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहण्याचा आदेश

सायबर गुन्हे शाखेने सर्वात अगोदर एसआयडीच्या तत्कालीन अधिकारी व जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स जारी केले होते. त्यानंतर दुसरे समन्स राज्यातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले जेष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांना सायबर गुन्हे शाखेने अधिकृत ई – मेलवर समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये सुबोध जैस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी सायबर गुन्हे शाखा बीकेसी येथे उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे. सुबोध जैस्वाल हे सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here