मुंबईत ३,४२१ पिलीयन रायडरसह ६,२७१ जणांवर कारवाई

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने गुरुवारपासून ‘पिलीयन रायडर’वर हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू केली आहे. मुंबईत वाहतूक विभागाने मुंबईभर केलेल्या कारवाईत ३,४२१ पिलीयन रायडरसह मोटार सायकलस्वार असे एकूण ६,२७१ जणांवर हेल्मेट न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून वाहतूक विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिलीयन रायडरला प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई

मुंबई शहरात मोटार सायकलस्वारांना हेल्मेट सक्ती असतांना मोटार सायकलच्या मागे बसणा-या पिलीयन रायडरलाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने २४ मे २०२२ रोजी एक पत्रक काढून हेल्मेटसक्ती करण्यात आली होती, वाहतूक पोलिसांनी १५ दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी गुरुवारी, ९ जून रोजी पूर्ण झाला असून गुरुवारी मुंबई वाहतूक विभागाच्या पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पिलीयन रायडर तसेच विना हेल्मेट मोटार सायकल चालविणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी मुंबईभर करण्यात आलेल्या कारवाईत ३,४२१ पिलीयन रायडर तसेच विनाहेल्मेट मोटार सायकल चालविणारा आणि मोटार सायकल स्वारासह विनाहेल्मेट असणारे ५१६ असे एकूण ६,२७१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोटार सायकल स्वारासह पिलीयन रायडरला प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास दंडाची रक्कम दुप्पट होईल व तिसऱ्यांदा मिळून आल्यास मोटारसायकल स्वाराचा परवाना ३ महिन्यासाठी रद्द करण्यात येईल अशी माहिती वाहतूक पोलीसानी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here