मुंबई पोलिसांनी एफडीएवर फोडले ‘खापर’! काय आहे पोलिसांचे म्हणणे? वाचा…

एफडीएने जर परवानगी दिली होती तर पोलिसांना त्यांनी कुठलीही कल्पना का दिली नाही.

78

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एका फार्मा कंपनीच्या संचालकाला राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना रात्री सोडून द्यावे लागले. रात्री झालेल्या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती असून देखील त्यांनी मुंबई पोलिसांकडून ही गोष्ट लपवून ठेवल्याचा आरोप, मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचे खापर मुंबई पोलिसांनी एफडीए(अन्न व औषधे प्रशासन)वर फोडले आहे.

काय झाले शनिवारी रात्री?

राज्यात रेमडेसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. दमण येथे असलेल्या ब्रुक फार्मा या कंपनीने रेमडेसिवीर या औषधाच्या ६० हजार कुप्यां(वायल)चा साठा करुन ठेवला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. शनिवारी रात्री या फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बिकेसी पोलिस ठाणे येथे आणण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी बोलावून घेतले. रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, स्थानिक आमदार पराग आळवणी या नेत्यांनी बिकेसी येथे पोलिस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांची भेट घेऊन डोकानिया यांंना कशासाठी आणण्यात आले असल्याचा जाब विचारला. महाराष्ट्रासाठी या कंपनीकडून रेमडेसिवीर मिळवण्यासाठी एफडीएची परवानगी घेण्यात आली आहे. मग कशासाठी तुम्ही कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतले, असा सवाल फडणवीस यांनी पोलिस उपायुक्तांना करुन त्यांना खडे बोल सुनावले होते. अखेर फडणवीस यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांवरुन डोकानिया यांना सोडून देण्यात आले.

(हेही वाचाः रेमडेसिवीरवरुन रात्रीस खेळ चाले… काय घडलं रात्री? वाचून धक्का बसेल!)

म्हणून एफडीएवर फोडले खापर

रात्री झालेल्या प्रकाराबाबत मुंबई पोलिसांकडून रविवारी प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. या पत्रात त्यांनी एफडीएवर सर्व खापर फोडले आहे. एफडीएने जर परवानगी दिली होती तर पोलिसांना त्यांनी कुठलीही कल्पना का दिली नाही. त्यांच्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध असताना एफडीएचे अधिकारी स्वतंत्रपणे वागत होते. मुंबई पोलिसांनी हे काम सद्भावनेतून केले आहे, पोलिसांचा त्यात कुठलाही उद्देश नव्हता, रेमडेसिवीरचा बाजारात सुरू असलेला काळाबाजार आणि नागरिकांना रेमडेसिवीरची होणारी टंचाई, या अनुषंगाने चौकशी करणे गरजेचे होते, असे मुंबई पोलिसांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चौकशीला हजर राहावे लागेल

रेमडेसिवीरची बेकायदेशीर होर्डिंग आणि काळाबाजारी प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांना देण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. जेव्हा आवश्यकता भासल्यास फार्मा कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे सांगून संचालकांना सोडण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचाः गृहमंत्री म्हणाले पोलिसांवरचा दबाव खपवून घेणार नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.