मुंबईसह भारताची आर्थिक कोंडी करण्याचा चीनचा डाव

129
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह भारताची आर्थिक कोंडी करण्याचा चीनचा डाव मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. मुंबईसह देशभरातील नागरिकांना बोगस लोन अॅप्सच्या जाळ्यात ओढून त्यांची हजारो कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या सायबर गुन्हे शाखाने देशभरातून १४ जणांना याप्रकरणी अटक केली असून, त्यात एका चीनी नागरिकांचा समावेश आहे.
कोविडच्या काळापासून या टोळीने बोगस लोन अॅप्ससारख्या शेकडो बोगस कंपन्या थाटून मुंबईसह देशभरातील नागरिकांची हजारो कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक केलेल्या हजारो कोटींच्या रकमेचे रूपांतर क्रिप्टो करन्सीमध्ये करून  ही करन्सी सुमारे ५० पेक्षा अधिक क्रिप्टो वॉलेट वळते करण्यात आले आहे. सायबर गुन्हे शाखेने बोगस लोन अॅप्स प्रकरणी या टोळीचे ३६० बँक खाते गोठवले असून, गोठवण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये सध्या १४ कोटींची रक्कम जमा असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेने दिली आहे.

चीन आणि नेपाळ या देशांत या टोळीचा म्होरक्या?

लियांग ची शेंग (३९),ओवेज सलीम अहमद (२९),विपुल शंकर गौडा (२४),स्नेह समीर सोमानी (३०),संजय वीर भान अरोरा (२८),विघ्नेश आनंद (२८),मल्लय्या चिक्कनव्या कुरुबा (२४),अजयकुमार अरुणकुमार (२५),प्रियांशी शेखरचंद्र कांडपाल (२४) व इतर ५ असे अटक करण्यात आलेल्या १४ जणांच्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. या १४ जणांना मुंबई, बेंगलोर, उत्तराखंड, गुडगाव,कोलकत्ता आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी ‘ऑनलाइन इन्स्टंट लोन अँप्स’ च्या माध्यमातून सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक व मानसिक छळ करून त्यांच्याकडून वसुली करणारी १४ गुन्हेगारांची आंतराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. लियांग ची शेंग हा या टोळीचा प्रमुख असून, या टोळीचे मूळ चीन आणि नेपाळ या राष्ट्रात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या टोळीकडून  मुंबईसह देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे ३६० बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने २०० पेक्षा अधिक ऑनलाइन लोन अँप्स तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून गरजवंत आणि गरिबांना लोन अँप्सच्या जाळ्यात ओढून त्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ केला जात होता.

याप्रकारे करत होते फसवणूक….

कोरोना काळात लॉकडाऊन लावल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि शेकडो लोक बेरोजगार झाले. हातावर पोट असणाऱ्याची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. त्याच काळात तत्काळ इन्स्टंट लोन अॅप्सचे जाळे देशभरात पसरले होते. घरबसल्या कर्ज मिळत असल्यामुळे, अनेकांनी हे लोन अँप्स डाउनलोड करून गरजेपुरते कर्ज घेण्यास सुरुवात केली होती. ५ ते १० हजार इतक्या रक्कमेचे कर्ज देत असल्याने, अशा लोन अॅपव्दारे कर्ज मिळवण्याचे प्रमाण वाढले. सदर लोन अँपव्दारे मिळणाऱ्या लोनचा व्याजदर अवाजवी असून असे अँप डाऊनलोड करताच ते डाऊनलोड करणाऱ्यास पिडीताने अँप इंन्स्टॉल करताना दिलेल्या परवानगीच्या आधारे पर्सनल कॉन्टॅक्ट डिटेल्स व गॅलरी सोबत माईक, कॅमेरा, मेसेज यांचा अक्सेस हा त्या लोन अँप कंपनीकडे जातो. तसेच लोन अँपवर सादर केलेला सेल्फी, पॅन व आधार कार्ड असा महत्वाचा डाटा हा संबंधीत कंपनीकडे संकलीत केला जातो. त्या डाटाच्या आधारे लोनची रिकव्हरी देण्यास उशिर करणाऱ्या, टाळा टाळ करणाऱ्या ग्राहकांना, त्यांचे नातेवाईकांना धमकी व अश्लिल मजकुराचे मेसेज पाठवले जातात. रिकव्हरी न देणाऱ्या ग्राहकास तसेच त्याने रिकव्हरी दिली असली तरी लोन अँप कंपनी अधिक वसुलीच्या हव्यासापोटी त्याने दिलेल्या फोटो गॅलरीच्या एक्सेसमुळे गॅलरीतील फोटो मॉर्फ करुन व्हॉटस् अँपच्या माध्यमातुन ग्राहकाच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्व लोकांना प्रसारित करते. तसेच लोन न घेता केवळ लोन अँप डाऊनलोड करणाऱ्या गाहकांचीदेखील अशाच प्रकारे छळवणूक केली जाते.
अशाप्रकारे सुरु होते बोगस लोन कंपन्यांचे अॅप
आरोपीची सखोल चौकशी दरम्यान तो लोन रिकव्हरीसाठी कॉलर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे चौकशीत नमुद गुन्हयातील पुढच्या फळीच्या आरोपीतांची माहिती प्राप्त झाली. हे आरोपी आपसातील कम्युनिकेशनकरता डिंगटॉक या अॅपचा तर ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी क्लीक टु चॅट, एन एक्स क्लाऊडचा वापर करत होते. हे सर्व आरोपी एक ग्रुप अथवा टोळी म्हणून कार्यरत होते. ज्यामध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र रोल होता. ज्यात लोन परताव्याची मुदत संपण्यापूर्वी कॉल करणारे, मुदत संपल्यावर कॉल करणारे तसेच लोन परत न करणाऱ्या ग्राहकास धमकावण्याचे काम करणारे, त्यापुढे ग्राहकास व त्याचे कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना अश्लिल मेसेज व मॉर्फ फोटो पाठवणारे यांचा समावेश होता. या सर्वांवर लक्ष ठेवण्याकरता टिम लीडरची नेमणूक केली असून त्यावर मॅनेजर व कंपनी डायरेक्टर असतात. या व्यतिरीक्त कंपनीच्या अर्थिक उलाढालीसाठी व सर्व यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी लागणारी बँक खाती व सिमकार्ड हे  छुप्या मार्गाने प्राप्त केली जातात.  या  गुन्हयात अदयाप पावेतो ३५० पेक्षा जास्त बँक खाती वापरण्यात आली आहे. अशा प्रकारे लोन अँप्सच्या माध्यमातून सामान्य जनतेची फसवणूक करण्याकरता या टोळीने बनावट (शेल ) कंपन्या स्थापन केल्या होत्या, या गुन्हयात २०० पेक्षा जास्त बनावट (शेल) कंपन्या समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.