पोलिसांना हवा आहे दिवाळीचा बोनस

132

दिवाळी सण जवळ येताच सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध लागलेले असतात, दसऱ्यापूर्वी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो, परंतु राज्यातील पोलीस दल या बोनसपासून नेहमी वंचित असतात. यंदा मात्र बोनसची चर्चा सुरू होताच पोलिसांनी देखील त्यात उडी घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पोलिसांना बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

( हेही वाचा : रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग)

मुंबई महानगरपालिकेने नुकताच कर्मचारी वर्गाला दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. बारा ते सोळा तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना बोनस देण्यात यावा यासाठी प्रत्येक वर्षी पोलीस दलात कुजबुज सुरू असते. मात्र ही कुजबुज आणि चर्चा केवळ दिवाळी पर्यंत असते त्यानंतर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती असते.

यावर्षी आर.आर. चव्हाण या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोनस देण्यात यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून बोनसची मागणी केली आहे. चव्हाण हे धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांनी पोलिसांच्या बोनसचा मुद्दा पुढे केला असून त्यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार पोलीस दल वगळून इतर कर्मचा-यांसाठी फक्त ५ दिवसांचा आठवडा आहे याप्रमाणे वर्षात ५२ शनिवार येतात तसेच प्रत्येक वर्षात पोलीस वगळून इतर सर्वांसाठी २४ शासकीय सुट्ट्या असतात. परंतु पोलीस कर्मचारी मात्र या ५२+२४-७६ दिवस बारा-पंधरा तास दररोज कर्तव्यावर असतात. तसेच कायद्याने व माणुसकीने बघायला गेलं तर पोलिसांना ७६ दिवसांचा पगार दिला पाहिजे, परंतु आम्हा पोलिसांना व आमच्या कुटुंबीयांना संपूर्ण आयुष्य तडजोड करायची सवय असल्यामुळे तडजोड करून फक्त एक महिन्याचा पगार आम्हाला दिवाळी बोनस म्हणून मिळावा अशी विनंती चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. पोलिसांचा बोनस, कामाच्या वेळा आणि सुट्ट्यांबाबत प्रत्येक वेळी कोणी न कोणी आवाज उठवत असतो, पत्रव्यवहार करीत असल्याचे गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु अद्याप याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.