मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बऱ्याचदा अपघात झाल्याच्या घटना घडत असतात. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर ताशी ८० किमीची वेगमर्यादा आहे. मात्र वाहन चालक या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. वेगाची मर्यादा न पाळल्याने पोलिसांना अनेकदा नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई देखील केली आहे. यासह अति स्पीडमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे प्रशासनाने एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे हॉट स्पॉट असलेल्या ७ जागी रबर स्ट्रीप टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
(हेही वाचा – कोकणात फिरायला जाताय? ‘या’ किल्ल्यावर नो एन्ट्री; पुढील ३ महिने समुद्र पर्यटन बंद)
चालकांच्या वेगावर येणार मर्यादा
मुंबई पुणे हायवेवर रबर स्ट्रीप टाकल्याने वाहने वेगाने चालवणाऱ्या चालकांना गाडीचा स्पीड मर्यादीत ठेवावा लागणार आहे. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून अफकॉन कंपनीसमोर उतारावरही रबर स्ट्रीप बसविण्यात येणार आहे.
या ७ हॉट स्पॉटवर बसणार स्पीड ब्रेकर
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कॅमेरे बसवण्यासह स्पीडगन वाहने देखील तैनात करण्यात आली आहेत, त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. सतत अपघाताच्या घटना घडत असल्याने अफकॉन कंपनीने सात ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यास सुरूवात केली आहे. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास, अंडा पॉईंट अशा चार ठिकाणी यापूर्वीच रबर स्ट्रीप बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सध्या दोन ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे रोज तीन वेळा १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मिळतेय.