मुंबई -पुणे महामार्गावरील सुसाट प्रवास आता महागणार आहे. या महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये लवकरच वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. या महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये दर ३ वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. यानुसार आता २०२३ मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा; हा असणार शेवटचा सामना)
पुणे-मुंबई या शहरांना हा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे अनेकदा सलग सुट्ट्या आल्या की या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता मात्र या महामार्गावरून प्रवास करताना सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यंदा टोलच्या दरांमध्ये किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून हे नवे दर लागू होतील तसेच २०३० पर्यंत हे दर लागू राहतील असे एमएसआरडीसीने सांगितले आहे.
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०३० पर्यंत मुंबई-पुणे प्रवासासाठी टोलचे दर …
वाहन | सध्याचे दर | १ एप्रिल २०२३ मध्ये किती असणार दर |
चारचाकी | २७० | ३२० |
टेम्पो | ४२० | ४९५ |
ट्रक | ५८० | ६८५ |
बस | ७९७ | ९४० |
थ्री एक्सेल | १३८० | १६३० |
एम एक्सेल | १८३५ | २१६५ |