मुंबईत सोमवारी रात्री कोसळलेल्या पावसाने बहुतांश भागात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद केली. आज, मंगळवारी ही मुंबईतील बहुतांश भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला. रात्रभर कोसळलेल्या पावसाने सकाळी बहुतांश भागात पाणी साठण्याची शक्यता असल्याने चाकरमान्यांनी कामासाठी बाहेर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केली.
कुठे किती झाली पावसाची नोंद
कुलाब्यात सकाळी साडेआठ वाजता 117.4 मिमी, वांद्रे येथे 134.5 मिमी, मुंबई विमानतळ परिसरात 134.5 मिमी, राम मंदिर परिसरात 134 मिमी, चेंबूर येथील टाटा पॉवर परिसरात 120 मिमी, विद्याविहारात 150.5 मिमी पावसाची नोंद झाली. जुहू विमानतळ परिसरातही 99.5 मिमी पाऊस झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात 94.5 मिमी, महालक्ष्मी येथे 71.1 मिमी तर सायन येथे 62.8 मिमी, मुंबईत सांताक्रूझ येथे 124.2 मिमी पाऊस झाला.
(हेही वाचा –परशुराम घाटातील वाहतूक अजूनही बंदच; वाहनाच्या लांबच लांब रांगा)
मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसाची हजेरी
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सतत कोसळणाऱ्या पावसाने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्त्यांवर कंबरेइतके पाणी साचल्याने त्याचा रस्स्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी चार चाकी वाहनं, दुचाकी बंद पडल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईत 4 जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज 5 जुलैलाही पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरातील विलेपार्ले, अंधेरी सबवे, हिंद माता, कुर्ला, वांद्रे आदी भागात पाणी साचल्याने बस आणि खासगी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होताना दिसतेय.
Join Our WhatsApp Community