महाराष्ट्रात ‘भागोजी कीर’ हे नाव फारसे कोणाला ठाउक नसेल. पण ‘मॅनेजमेंट गुरुदेव’ म्हणून या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल इतके महान कार्य त्यांनी केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भागोजी कीर यांचा जन्म झाला आणि याच महाशिवरात्रीच्या तिथीला त्यांची पुण्यतिथीदेखील असते. मुंबईच्या शिल्पकाराचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया.
मुंबईत येऊन संघर्षमय जीवनाला सुरुवात
१८६७ मध्ये अठराविश्वे दारिद्र्यात भागोजी यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. भागोजी कीर त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळोजी शेतमजूर होते. भागोजी यांना शिकायचे होते. त्यांनी सरकारी शाळेत प्रवेश मिळवला. तिथे शिक्षण फुकट होते. पण सोनचाफ्याची दोन फुले आणि उंडलाच्या बिया (त्यातून कडू तेल काढतात) विकून त्यातून वह्या-पुस्तकांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. ‘कमवा आणि शिका’ ह्याची सुरुवात भागोजीने इतक्या कोवळ्या वयात केली होती.
(हेही वाचा दिल्ली दंगल प्रकरणी गांधी कुटुंबियांना उच्च न्यायालयाची नोटीस)
मुंबईचे शिल्पकार बनले
मुंबई ही भागोजींसाठी स्वप्ननगरी होती. शापूरजी पालनजी यांची त्यांची भेट झाली आणि त्यांचा संघर्ष संपला. शापूरजी यांनी त्यांनी भागोजी यांना कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्याकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुले विकून शिक्षण घेणारा रत्नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला. दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत.
वीर सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर बांधले
लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग वगैरे ठिकाणचे बांधकाम भागोजीशेठ कीर यांनी केले. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी काँक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली. एका शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला आणि त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य हाती घेतले. ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. गरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणाची आपल्याप्रमाणे परवड होऊ नये म्हणून त्यांनी १९२९ साली रत्नागिरीत शाळा बांधली. त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचं म्हणजे वीर सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर भागोजी कीरांनी बांधून दिले. २२ फेब्रुवारी १९३१ ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुलं झालं. पतितांना पावन करणारं म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असं ठेवलं. अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेलं ते भारतातलं पहिलं मंदिर ठरलं. अशाप्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला. भागोजी कीर यांनी केलेले हे लोकाभिमुख कार्य आजही काळाच्या खूप पुढे असणारे आहे.
Join Our WhatsApp Community