मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले आहे, याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन करायला हवे. आता यावरुन राजकारण सुरु झालेलं आहे. छात्रभारतीने वीर सावरकर यांच्या नावाला विरोध केला असून त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव या वसतीगृहाला देण्यात यावे, असं म्हणत नवा वाद उकरून काढलेला आहे.
बाहेरुन येणार्या विद्यार्थ्यांना सावरकरांचे महत्व कळेल
राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आहे. ते म्हणाले की, बाहेरुन येणार्या विद्यार्थ्यांना सावरकरांचं महत्व कळेल. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला शिकायला गेले होते. शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकार्य सुरु ठेवलं होतं. लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची एकजूट करुन त्यांनी इंग्रजी सत्तेला इंग्रजांच्या भूमीत जाऊन आव्हान दिलं. मदलनान धिंग्रासारखा तरुण हुतात्मा त्यांनी निर्माण केला. स्थानिक वृत्तपत्रात त्यांचे लेख छापून येत होते. १८५७चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ याच काळात पूर्ण झाला. प्रकाशन होण्याआधीच या ग्रंथावर इंग्रज सरकारने बंदी आणली. मार्सेलिस बंदरावरचा पराक्रम अशा अनेक गोष्टी वीर सावरकरांनी विद्यार्थी असताना केल्या. एक विद्यार्थी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर. क्रांतिकार्यात भाग घेतला तरी अभ्यासात ते मागे नव्हते. लेखन, वक्तृत्व, क्रांतिकार्य, अभ्यास, जगभरातील क्रांतिकारकांशी संबंध अशा अनेक गोष्टी ते यशस्वीपणे करत होते.
विद्यार्थ्यांमध्ये देश-प्रेम जागृत करण्याचे काम सुरु झाले
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वीर सावरकरांचे हे गुण असायला हवेत. अभ्यास करत असताना आपल्या देशाप्रति असलेलं आपलं कर्तव्य बजावण्याची बुद्धी आताच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. शाहू महाराज की सावरकर असा वाद निर्माण न करता, शाहू महाराज कुठे हवेत आणि सावरकर कुठे हवेत याचा अभ्यास केला पाहिजे. शाहू महाराजांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला वीर सावरकरांचेच नाव हवे. याचे कारण वर सांगितले आहे. आजच्या काही विद्यार्थ्यांचा कल सुखवस्तू जीवनाकडे आहे. आपण राष्ट्राचे, समाजाचे देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात जागृत झाली पाहिजे. तरुणपणीचे सावरकर कळले तर रत्नागिरीतले सावरकर जाणून घ्यायची ओढ लागेल. वीर सावरकर म्हणजे क्रांतिकार्य आणि समाजकार्य हातात हात चालत असातात. आधी स्वातंत्र्य की, आधी समता हा प्रश्न सावरकरांना कधी सतावला नाही. त्यांनी सुवर्णमध्य साधला. आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला वीर सावरकरांचे नाव देऊन विद्यार्थ्यांमध्ये देश-प्रेम जागृत करण्याचे काम सुरु झालेले आहे.
Join Our WhatsApp Community