मुंबईकरांनो सावधान! विनामास्क कारवाईतून दिवसाला २४ लाख वसूल करण्याचे पोलिसांना दिले टार्गेट!

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई पोलिसांची मदत घेतली आहे. पोलीस त्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करू लागले आहेत, मात्र यात पोलीस खात्याचा आर्थिक स्वार्थ दडल्याची माहिती समोर आली आहे. 

कोरोनाकाळाचा कोण कशासाठी फायदा घेईल सांगता येत नाही. नव्याने वाढलेल्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत सध्या महापालिकेचे पावती पुस्तक घेऊन मुंबई पोलीस रस्त्यावर फिरून विनामास्क फिरणाऱ्यांकडून २०० रुपये वसूल करत आहेत. यातून जमा होणार निधी म्हणे महापालिका आणि पोलीस ५०-५० टक्के वाटून घेणार आहेत. पोलीस हा निधी वेल्फेअर फंडात जमा करणार असल्याने मुंबईतील १२ पोलीस परिमंडळांना दिवसाला किमान १ हजार विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो, जरा जपून! पोलीस दिवसाला २४ लाख रुपये तुमच्या खिशातून वसूल करणार आहेत.

दिवसाला किमान १००० विनामास्क कारवाईचे टार्गेट! 

मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस परिमंडळाला दिवसाला किमान १ हजार विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिला आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांनी आता महत्वाच्या कामांवरून थोडे लक्ष बाजूला करून विनामास्क कारवाईवर जोर दिला असल्याचे चित्र अवघ्या मुंबापुरीत बघावयास मिळत आहे. मुंबई महापालिकेने या दंडाच्या रकमेतील अर्धी भागीदारी पोलीस वेल्फेअरसाठी देण्याचे कबूल केल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून परिमंडळ अधिकारी यांना जास्तीत जास्त जणांवर कारवाई करण्याचे टार्गेट दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत प्रत्येक ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा पोलीस कर्मचारी रस्त्यावर विनामास्क तसेच थुंकणाऱ्यावर कारवाई करतांना अधिक प्रमाणात दिसत आहेत.

(हेही वाचा : बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ: आयकर विभागाची अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घरावर धाड )

महापालिकेनेच पोलिसांना कारवाईसाठी दिले अधिकार! 

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. अनेक जण विनामास्क रस्त्यावर फिरत असल्यामुळे त्यांना शिस्त लागावी यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मोहीम उघडली आहे. महापालिकेने कारवाईसाठी क्लीनअप मार्शल यांच्यावर जबाबदारी दिल्यामुळे क्लीनअप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत. क्लीनअप मार्शल हे खंडण्या गोळा करीत असल्याचा आरोप होत असल्यामुळे अखेर महापालिकेने मुंबई पोलीस दलाला विनामास्क, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी महापालिकेने कारवाईतील अर्धी रक्कम पोलीस वेल्फेअर फंडाला देण्याचे कबूल केले आहे.

पैशाचे असे आहे गणित!

मुंबईत १२ पोलीस परिमंडळ आहेत. प्रत्येक परिमंडळाला १००० विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टार्गेट दिले आहे.  म्हणजे दररोज १२ हजार जणांवर कारवाई होणार. त्यातून दररोज २४ लाख रुपये महसूल जमा होणार. त्यातील अर्धी रक्कम म्हणजे १२ लाख रुपये पोलीस वेल्फेअर फंडात जमा होणार आहे. ही कारवाई महिनाभर केल्यास एका महिन्यात पोलीस वेल्फेअर फंडात ३ कोटी ६० लाख इतकी रक्कम जमा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here