कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्ष गणपती उत्सव साजरा केला गेला. यंदा कोरोनाचे विघ्न सरल्याने गणेशभक्तांनी गणपती उत्सव दणक्यात साजरा केला. परिणामी यंदा मुंबईतील विविध भागात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना मुंबईत बाबुलनाथ मंदिर परिसरात सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण झाले. आवाजाची मर्यादा 115.6 डेसिबलपर्यंत पोहोचली. ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या आवाज फाउंडेशन या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या नोंदणीत ही माहिती उघडकीस आली.
कोरोनाच्या आगमनापूर्वी मुंबईत 2019 साली आवाजाची मर्यादा 111.5 डेसिबल पर्यंत पोहोचली होती. दोन वर्षांपूर्वी आणि आताही आवाजाची मर्यादा बेंजोमुळे वाढली गेली – सुमैरा अब्दुलली, प्रमुख, आवाज फाउंडेशन
दोन वर्षांनी मिरवणुकीत बेंजो वाजला
2020 साली कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना सरकारच्यावतीने कडक निर्बंधाचे पालन करावे लागले. 2021 सालीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात गणेशोतस्वात कडक निर्बंध कायम राहिले. आता दोन वर्षांनी कोरोनामुळे कोणतेही कडक निर्बंध सरकारने लादलेले नाही. त्यामुळे गणपती मिरवणुकीला ड्रम्स, बेंजो, कॉलोनिकल लाऊडस्पीकर, मेटल सिलेंडर आदी साधनांच्या मदतीने जोरजोरात नजीकच्या परिसरात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले.
(हेही वाचा – मुंबईत गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मुंबई पोलिसांची तारेवरची कसरत)
बाबूलनाथ परिसरात सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण
गिरगाव येथील बाबूलनाथ परिसरात सोमवारी मुंबईतील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण नोंदवले गेले. या भागातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालेल्या गणपती मिरवणूकीत ड्रम्स, बेंजो वाजवले गेले. परिणामी, आवाजाची मर्यादा 115.6 डेसिबलपर्यंत पोहोचली. वांद्रे येथेही 112.1 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण मोजले गेले. त्यानंतर वांद्रे येथील लिंकिंग रोड येथे 109.4 डेसिबल एवढी आवाजाची मर्यादा पोहोचली.