बेस्ट अ‍ॅप : मराठीचा आग्रह, ‘चलो’ नको ‘चला’च…!

80

पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात नागरिकांचा बेस्ट प्रवास सोयीचा व्हावा,  यासाठी ‘चलो अ‍ॅपचे’ अनावरण केले. या अ‍ॅपमुळे मुंबईकरांना घरबसल्या बसचे लोकेशन, तिकिटांमध्ये सवलत, सुपर सेव्हर पास या सुविधांचा लाभ मिळत आहे. परंतु या अ‍ॅपच्या हिंदी नावावर मराठी भाषिकांनी आक्षेप नोंदवला आहे.

चलो नाही चला

मराठीप्रेमी पालक महासंघाचे समन्वयक आनंद भंडारे यांनी चलो ऐवजी ‘चला अ‍ॅप’ असे म्हणता आले असते असे आपल्या फेसबुक पोस्टमधून सुचित केले आहे. “चला (CHALA) ही दोन अक्षरं वापरली असती, तर बेस्ट उपक्रमात काही बदल झाला असता असे अजिबात नाही. पण आपल्या भाषेप्रती बेस्ट किती जागृत आहे. याची जाणीव समस्त मुंबईकरांना झाली असती. ही संधी बेस्टने आणि तिच्या पालनकर्त्यांनी स्वत:हून गमावली. अशी खंत भंडारे यांनी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : क्लीन मार्शल बोगस वाटतोय…इथे साधा संपर्क! )

बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. गेले कित्येक वर्ष मराठी माणूस आपल्या हक्काच्या बेस्ट बसने प्रवास करत आहे. चलो अ‍ॅपचे तंत्रज्ञान तमाम मुंबईकरांसाठी तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांसाठीही नवखे आहे. हिंदीमध्ये नाव आहे म्हणून जास्त प्रवासी आकर्षित होतील असे नाही. तर मराठमोळे नाव मुंबईकरांना अधिक आकर्षित करेल. असा विश्वास अनेक बेस्ट प्रवाशांनी व्यक्त केला आहे. या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट आहे. पण मुंबईकरांच्या बेस्ट बसच्या अ‍ॅपचे नावही मराठीतच हवे, असा आग्रह प्रवाशांचा आहे.

अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत 

चलो अ‍ॅपचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होते. चलो सुपर सेव्हर योजना तुम्हाला तुमच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यास मदत करतात. सुपर सेव्हर योजना चलो कार्ड आणि चलो अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवरून तुम्ही तुमचा पास काढू शकता तसेच पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत उपलब्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.