मुंबईला भरली हुडहुडी! पारा थेट १३.२ °C वर…

पावसाच्या हजेरीनंतर मुंबईकरांचा सोमवार गारेगार झाला. किमान तापमानाने थेट १३.२ अंश सेल्सिअसवर उतरला. सकाळी लोकलचा प्रवास करणा-या प्रवाशांना, मॉर्निंगवॉकर्सला या तापमानाने चांगलीच हुडहुडी भरवली. जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच पारा एवढा खाली सरकला. त्यामुळे दिवसभरात मुंबईत आज थंडीच्या वा-यांचाही प्रभाव राहील.

शनिवारी अचानक पावसाच्या मा-याने छत्री नसलेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. ऐन हिवाळ्यात थंडीऐवजी पावसाच्या अनुभवानंतर मुंबईकर बुचकाळ्यात पडले होते. वीकेण्डला थंडीचाच अनुभव आल्यानंतर घराबाहेर जाताना शाल, मफलर, स्वेटर आणि कानटोप्यांसहच बाहेर पडणे सोयीस्कर असल्याचे दिसत होते. सोमवारी मात्र रविवारच्या तुलनेत किमान तापमान पाच अंशाने खाली सरकले. रविवारी १८.२ अंश सेल्सिअसवर नोंदवलेले किमान तापमान सोमवारी थेट १३.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. दुपारी बारा वाजल्यानंतरही सूर्य डोक्यावर येऊनही उन्हाचा कडाकाही फारसा मुंबईकरांना अनुभवता नाही आला. थंडीचा प्रभाव जाणवत असल्याने कित्येकांनी घराच्या खिडक्याही बंद ठेवणे पसंत केले. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान २७ आणि २६ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. किमान तापमान खाली सरकल्याने कमाल तापमानातही घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा –चौथी लाट येणार? ओमायक्रॉननंतर ‘या’ देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’)

हवेचा दर्जा सुधारला

थंडी वाढलेली असली तरीही मुंबईत हवेचा दर्जा सुधारलेला दिसून आला. संपूर्ण मुंबईची हवेची गुणवत्ता केवळ ५८ वर दिसून आली. विविध भागांत हवेचा दर्जा प्रवासासाठी योग्य असल्याचे दर्शवण्यासाठी ‘मुंबई सफर’ या संकेतस्थळावर हिरवा रंग दाखवण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here