मुंबईतील नाल्यांमधून समुद्रात पाणी सोडले जाणाऱ्या १८६ पातमुखांपैकी ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर १३५ पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. याचाच अर्थ केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. मुंबईची सखल भौगोलिक रचना, जगभरातील वातावरण बदल, अतिवृष्टी या घटनांवर मानवी नियंत्रण नसले तरी वेगवेगळ्या उपाययोजना केल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहण्याचा कालावधी पूर्वीच्या तुलनेत कमी झाला असल्याचा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांनी केला आहे.
( हेही वाचा : तीन महिन्यांत इतकी रजा घेतली तर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार फिटनेस सर्टिफिकेट! )
अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण
प्रामुख्याने हवामानातील बदल, भौगोलिक व इतर कारणांनी मुंबई महानगराला पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना याविषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने सह्याद्री राज्य अतिथीगृहात गुरुवारपासून दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सांख्यिकी तपशीलाआधारे अतिशय अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले. ते म्हणाले की, पूर जोखीम संदर्भातील या कार्यशाळेतून नामांकीत संस्थांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने महानगरपालिकेला अनेक गोष्टी शिकता येतील. जगातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता दोन ते तीन पटीने जास्त आहे. समुद्रसपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाळ्यात हमखास पाणी साचते. मुंबईतील पर्जन्यमान देखील बदलत असून एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसात कोसळतो.
कार्यशाळा उपयुक्त
मुंबईतील नाल्यांमधून समुद्रात पाणी सोडले जाणाऱ्या १८६ पातमुखांपैकी ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर १३५ पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. याचाच अर्थ केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. मुंबईची सखल भौगोलिक रचना, जगभरातील वातावरण बदल, अतिवृष्टी या घटनांवर मानवी नियंत्रण नसले तरी वेगवेगळ्या उपाययोजना केल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहण्याचा कालावधी पूर्वीच्या तुलनेत कमी झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेने सहा पर्जन्य जलउदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) बांधली आहेत. त्यातून ७० हजार दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणी उपसा करण्याची क्षमता आहे. मुंबईतील ३८६ पैकी २८० ठिकाणी पूरप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. दरवर्षी नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर गाळ काढला जातो. या सर्व उपाययोजना होत असल्या तरी दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना करण्यासाठी याप्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त आहेत. धोरणात्मक बदलांसोबत आता कायद्यांची कठोर अंमलबजावणी देखील करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
Join Our WhatsApp Community