महापालिका सहायक आयुक्त अंडे यांची बदली आता घाटकोपर एन विभागात

160

मुंबई महापालिकेच्या तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर गुरुवारी आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांचीही बदली करत घाटकोपर एन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तर एन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त संजय सोनावणे यांना पुन्हा नगर अभियंता विभागात पाठवण्यात आले आहे.

घाटकोपर एन विभागात बदली

मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाच्या सहायक आयुक्त असलेल्या मृदुला अंडे यांची बदली काही महिन्यांपूर्वी दहिसर आर उत्तर विभागात करण्यात आली होती. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर अंडे यांनी प्रथमच प्रशासकीय विभागाचा कार्यभार सांभाळला. या आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक परिमंडळांमध्ये एक पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमी उभारण्याचे धोरण मंजूर झाल्यानंतर दहिसरमध्ये प्रथमच ही स्मशानभूमी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पेट पार्कची सुधारणा अणि फिश पार्क आदींची कामे यासह केतकीपाडा कोकणीपाडा तरे मार्ग येथे ३ समाज विकास केंद्र सुरु करण्यात आली तसेच दोन दवाखाने जे अनेक वर्षांपासून वापरात नव्हते ते सुरु करण्यात आले. याशिवाय रावळापाडा येथे प्रसुतीगृह बनवण्यासाठी अंडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अंडे आता घाटकोपरच्या विकास कामांना कशी गती देतात आणि तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कशाप्रकारे काम करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

( हेही वाचा : ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद)

एन विभागाच्या सहायक आयुक्तपदी असलेले अजित आंबी यांनी कोविड काळामध्ये चांगल्याप्रकारे काम केले होते. परंतु त्यांची बदली भांडुप एस विभागात झाल्यानंतर कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांची एन विभागाच्या सहायक आयुक्तपदी प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. अंडे यांची बदली झाल्याने आर उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता नयनीश वेंगुर्लेकर यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.