मुंबईतील दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु होऊन सर्व जनजीवन सुरळीत झाले आहे. सर्व दुकाने आणि आस्थापने पूर्ण क्षमतेने उशिरापर्यंत सुरु असूनही कोविडच्या नावाखाली प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीबाबत प्रशासनाने हाती घेतलेली कारवाई जवळपास थंड पडलेली असतानाच आता पुन्हा ही कारवाई जोरात सुरु आहे. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईसाठी पथके कार्यरत करून कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई जोर धरणार असल्याने सर्व दुकानांची झाडाझडती घेतली जाणार आहे.
मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा दुकाने नियमित वेळेत सुरु झाली आहेत. दुकानांसह रस्त्यांवरील फेरीचेही धंदे सुरळीत सुरु आहेत. पण यासर्वांकडून सध्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. मात्र, कोविडच्या नावाखाली मुंबई महापालिकेने या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईची मोहिम जवळपास गुंडाळून ठेवली होती. तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हा मुद्दा लावून न धरता हाताची घडी तोंडावर बोट असाच पावित्रा घेतला होता. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई ही प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादक आणि दुकानदारांच्या दबावाखाली गुंडाळली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता प्रशासनानेन पुन्हा मोहिम रावबून प्लास्टिक पिशव्यांना हद्पार करण्याचा पण केला आहे.
महापालिकेने केले आवाहन
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठीची कारवाई तीव्र करण्याचे निर्देश सर्वांना देत मे २०२० पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यास सांगितले होते. त्यामुळे महापालिकेने मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर १ मार्च २०२० पासून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह सर्वांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार करण्यात येत होते. परंतु मार्चपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने कोरोना नियंत्रणात आणण्याचे पहिले कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले.
त्यातच दुकानेही बंद असल्याने प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईचे महत्व तेवढे वाटले नसले तरी दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊननंतर ज्याप्रकारे अनलॉक करत काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर दुकाने पुन्हा सुरु झाली. पण या दुकानांसह फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होऊ लागला आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीची मोहिम राबवणाऱ्या महापालिकेने ही कारवाई थांबवली का की प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी दिली,असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू लागला होता.
यासंदर्भात परवाना विभाग आणि दुकाने व आस्थापना विभागाचे उपायुक्त संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाई पुन्हा एकदा हाती घेत तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांमध्ये यासाठीची पथके तयार आहेत. त्यामुळे त्यांना कारवाई करण्यासाठी या पथकांना पुन्हा सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही कारवाई निश्चित मोठ्या स्वरुपात झालेली पहायला मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : शक्ती कायदा मंजूर, पण खोटी तक्रार केली तर… )
उपायुक्त (विशेष) निधी चौधरी होत्या म्हणून. . .
जून २०१८ पासून प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यापासून मार्च २०२० पर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी मुंबईत सुमारे १६ लाख आस्थापनांना भेटी देऊन जवळपास ८६ हजार किलो प्लास्टिक जप्त केला होता. तर त्याअंतर्गत सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपयांचा दंडही वसूल केला होता. परंतु पुढे कोविडनंतर आजतागायत प्लास्टिक विरोधी कारवाई पूर्णपणे थांबली आहे. तत्कालिन उपायुक्त(विशेष) निधी चौधरी यांनी या मोहिमेमध्ये प्रचंड मेहनत घेत यासाठी लागणारी पथके निर्माण करत कारवाईमध्ये सुसुत्रता आणली होती. परंतु चौधरी या प्रसुती रजेवर गेल्यानंतर ही कारवाई कमी झाली होती. परंतु पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर चौधरी यांनी या कारवाईला गती दिली होती. परंतु पुन्हा त्यांची बदली झाल्यानंतरही ही कारवाई थांबली आणि त्याला कोविडच्या आजाराची साथ मिळाल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे पूर्णच कानाडोळा केला होता.
प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास. . . .
प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये,
दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये,
तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद
Join Our WhatsApp Community