ठाण्यात एका ज्वेलर्स मालकाचे अपहरण करुन हत्या केल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच नालासोपाऱ्यात ज्वेलर्स मालकाची हत्या करुन लाखोंची लूट करण्यात आल्याची घटना शनिवारी भरदिवसा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. शहरामध्ये हत्या, लूट, अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
(हेही वाचाः गुंडाच्या दहशतीला कंटाळून त्याच्याच नातलगांनी ‘असा’ केला त्याचा अंत!)
अशी घडली घटना
किशोर जैन असे हत्या करण्यात आलेल्या या ज्वेलर्स मालकाचे नाव आहे. किशोर जैन यांचे नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ साक्षी नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी सकाळी किशोर जैन यांनी दुकान उघडले व दुकानात पूजा करत असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश करुन किशोर जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र किशोर जैन यांनी चावी देण्यास नकार देताच दोघांनी किशोर जैन यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोर दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन काही क्षणातच पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
(हेही वाचाः D-Mart च्या ‘त्या’ लिंकमध्ये ‘कुछ तो गडबड हैं’… सायबर पोलिसांनी दिला इशारा)
व्याप-यांमध्ये दहशत
दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येच्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. तर, नेमका कितीचा ऐवज लुटून नेला, त्याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः चक्क खोट्या नोटा देऊन फसवणुकीपासून वाचला)
खाडीत सापडला मृतदेह
ठाण्यातील भरत जैन यांचे १४ ऑगस्ट रोजी अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करुन त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. कळवा पोलिसांना भरत जैन यांचा मृतदेह शुक्रवारी सापडला आहे. भरत जैन यांचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
Join Our WhatsApp Community