माझ्या तीनही मुलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे माझ्या आणि माझ्या बायकोच्या मरणोत्तर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार होणार की नाही, यावर शंका असल्याने मी माझी संपत्ती मंदिराच्या नावे करत आहे, असे तमिळनाडूतील कांचीपुरम येथे राहणा-या 85 वर्षीय एका हिंदू व्यक्तीने सांगितले आहे. कांचीपुरमचे रहिवासी असलेल्या वेलायथम यांना भीती आहे की, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा हिंदू विधींनुसार त्यांचे अंतिम संस्कार करणार नाहीत, म्हणून त्यांनी आपली संपत्ती मंदिराला दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वत:चे 2 करोड रुपयांचे घर कुमारकोट्टम मुरुगन मंदिराला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेलायथम यांची व्यथा
तामिळनाडूच्या आरोग्य विभागात काम करणारे वेलायथम हे आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे 2 हजार 680 चौरस फुटांचे घर असून, त्याची किंमत अंदाजे 2 कोटी आहे. एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली असताना ते म्हणाले की, मी खूप दुःखी आहे. माझे हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले होते. एक हिंदू म्हणून माझे अंतिम संस्कार हिंदू परंपरेनुसार झाले पाहिजेत, पण माझ्या तिन्ही मुलांनी ख्रिश्चनांशी लग्न करून तो धर्म स्वीकारला. त्यामुळे हिंदू परंपरेनुसार माझे अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबात कोणीही उरले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.
( हेही वाचा: मोठी बातमी! ओबीसी आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी )
घर मंदिर प्रशासनाला देण्यात यावे
माझा मृत्यू झाला तर माझ्यावर अंतिम संस्कार करण्याचा हक्क माझ्या मुलांना नाही. तसेच, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे त्यांना माझी संपती देण्यास मी इच्छुक नाही. मी आणि माझी पत्नी जिवंत असेपर्यंत ते इथे राहू शकतात. पण आमचा मृत्यू होताच, हे घर मंदिर प्रशासनाच्या स्वाधीन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागातील (एचआरसीई) मंत्र्याकडे हा करार सोपवला आहे.
Join Our WhatsApp Community