खान्देशातील सारंगखेड्याचा ‘घोडे बाजार’: ५ कोटींचा ‘रावण’ ठरला लक्षवेधी

94

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा हे गाव यात्रेसाठी ओळखले जाते. यामध्ये सर्वांना आकर्षण असते यात्रेत भरणाऱ्या घोडेबाजाराचे. आशिया खंडातील अश्व बाजारात खान्दशच्या सारंगखेड्याच्या घोडेबाजाराची चर्चा असते. या घोडे बाजारात निरनिराळ्या प्रकारचे घोडे दाखल होत असतात. येथील पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडेबाजार दरवर्षी दत्त जयंतीच्या दिवशी भरतो. साधारण १५ दिवसांपर्यंत असणाऱ्या या यात्रेत हिंदी, मराठी चित्रपट कलाकारांसह विदेशी पर्यटकदेखील आवर्जून हजेरी लावतात. पर्यटन विभागाच्या चेतक फेस्टिवलमुळे सारंगखेडा घोडेबाजाराची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

यंदा ४०० घोड्यांची विक्रीतून तब्बल दीड कोटीची उलाढाल

भारताचा सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून ओळखला जाणारा घोडे बाजार कोरोना महामारीतही तेजीत होता. या यात्रेदरम्यान घोड्यांची खरेदी-विक्री जोरात झाली असून ३२० घोड्यांच्या विक्रीतून ८५ घोड्यांची खरेदी खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून करण्यात आली. विशेषतः यंदा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात घोड्यांची विक्री झाली तर ४०० घोड्यांची विक्रीतून तब्बल दीड कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.

दोन वर्षांनंतर रंगली अश्व सौंदर्य स्पर्धा

यंदा गुरूवारी २३ डिसेंबर रोजी दोन वर्षांनंतर सारंगखेडा येथील घोडे बाजारात अश्व सौंदर्य स्पर्धा रंगली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्व सौंदर्य स्पर्धेत नुकरा जातीच्या दोन दंत नर, दोन दंत मादी तसेच नुकरा नर नुकरा मादी या गटात ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेत घोड्याची चाल, घोड्याचा रंग रुबाब, पायाच्या खुरा, पाय, कान विविध लक्षणे बघून परीक्षक घोड्यांची विजेते म्हणून निवड केली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परराज्यातून नामवंत स्पर्धक आपले उमदे घोडे घेऊन येतात. यावेळी पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

५ कोटींचा ‘रावण’ ठरला लक्षवेधी तरीही विक्री नाही

सारंगखेडा यात्रेत राज्यातील विविध भागांमधून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात. या यात्रेत विकल्या जणाऱ्या घोड्यांवर लाखो-करोडोंची बोली लागते. यंदा मात्र नाशिक येथून आलेला रावण घोडा सर्वाधिक लक्षवेधी ठरला. यात्रा संपली तरी ‘रावण’ नावाच्या या घोड्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. या घोड्याला तब्बल ५ कोटी रुपये इतकी मागणी आली होती. परंतु या घोड्याच्या मालकाने घोड्याच्या विक्रीसाठी नकार दिल्याचे कळतेय.

असा आहे डॅशिंग ‘रावण’

सारंगखेडच्या यात्रेत आलेल्या रावणाची किंमत ५ कोटी निश्चित करण्यात आली होती. त्याची बोली आधी लाखांपासून सुरू झाली होती. रावण हा मारवाड जातीचा आहे. रावणचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असून, त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच ठिपका आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे असल्यामुळे घोड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे त्यांच्या मालकांकडून कळालं. या घोड्याची लांबी ६८ इंच असून, या प्रामुख्याने प्रजननासाठी वापरला जातो.

रावणचा दिवसाचा खुराक ऐकून व्हाल थक्क

रावणला दररोज १ किलो तूप, १० लिटर दूध, ५ गावरान अंडी, बाजरी आणि ड्रायफ्रूट्स खातो. रावणाची काळजी घेण्यासाठी नेहमी दोन लोक असतात. तर रावणचा खुराक आणि इतर कामांसाठी दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होतो, असे रावणाच्या मालकाने सांगितले. या मालकाचा रावणाला विकण्याचा कोणताही सध्या विचार नाही, मात्र या नावाजलेल्या जत्रेत त्यांच्यावर कितीची बोली लागते, यासाठी या यात्रेत त्यांनी सहभाग घेतला होता.

देशभरातून घोडे दाखल

महाराष्ट्रातील सर्वात मोठी घोडेबाजाराची यात्रा समजली जात असल्याने याठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांतील घोडे विक्रीसाठी येतात. तसेच भारताच्या सीमारेषेवरील काही गावांमधून, पाकिस्तानातूनही घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.