ओडिशा येथून बीड जिल्ह्यात जाणारा गांजाचा ट्रक नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. नागपुरातील पारडी परिसरात झालेल्या कारवाईत 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 1 कोटी 5 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी हा माल स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना गांजा तस्करीबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. सोबतच पोलिसांची सामाजिक सुरक्षा शाखा देखील अलर्ट मोडवर होती. पोलिस आयुक्तांचे निर्देश असल्यामुळे नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात बुधवारी मध्यरात्रीपासून वाहन तपासणी मोहिम हाती घेतली. सुमारे दोन तास वेगवेगळ्या ट्रकांची तपासणी केल्यानंतर पारडी ठाण्यातंर्गत येणाऱ्या कापसी उड्डाणपुलाजवळ एक ट्रक (वाहन क्र. एपी 16 टीए 7349) संशयास्पदरित्या जाताना दिसला.
ट्रकचा ड्रायव्हर-क्लिनर ताब्यात
पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता पोलिस हैराण झाले. या ट्रकमध्ये वर सामान आणि त्याखाली गांजा भरला होता. वरचे सामानच इतके ठासून भरले होते की ट्रक खाली करायलाच 2 तास लागले. त्याखाली ठेवलेला गांजा पाहून पोलिसांचे डोळे विस्फारले. ट्रकमध्ये गांजा मिळाल्याची माहिती पोलिस आयुक्तांना देताच त्यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी ट्रकच्या ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आले आहे.
(हेही वाचा – MSRTC: एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय)
याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ओडिशातून नागपूरमार्गे दक्षिण भारतात गांजाची वाहतूक होणारे काही मार्ग आम्ही आयडेंटीफाय केले होते. ही खेप मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जात होती. तेथे हा माल स्वीकारणाऱ्यांना बीड पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
Join Our WhatsApp Community