नागपूर पोलिसांनी 9 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत नागपूर शहरातील रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल्सवर, चौकांवर थांबून भिका-यांच्या भीक मागण्यावर, तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यांवर बंदी घातली आहे. त्यासाठी नागपूर पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. तसेच, या घटकांकडून फुटपाथ, रस्त्यांमधील दुभाजक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी थांबून वाहतुकीला अडथळा होईल, असे कृत्य करण्यावरही बंदी घातली आहे. कोणत्याही भिका-याने किंवा इतर कुठल्याही तत्सम व्यक्तीने या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम 188 अन्वये त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल, असे नागपूर पोलिसांनी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
( हेही वाचा: कॉलेज ट्रस्टीच्या मुलीनेच फोडला 12 वीचा पेपर; क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक खुलासा )
भिका-यांवर बंदी का?
नागपुरात चौकांमध्ये भीक मागणा-यांविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत. नागपुरात 9 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत रस्ते, ट्रॅफिक सिग्नल आणि चौकांमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भीक मागणारे सार्वजनिक ठिकाणी थांबून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अशा भिका-यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. नागपुरात मार्चमध्ये जी-20 बैठकीसाठी सुमारे 200 परदेशी पाहुणे येणार आहेत. त्यामुळेच पोलिसांनी हे बंदी आदेश लागू केले आहेत.