गेल्या पाच दशकांत मे महिन्यामध्ये १०७ वेळा उष्णतेची लाट पाहिलेले नागपूर हे राज्यातील एकमेव शहर ठरलं आहे. भारतीय हवामान खात्याने १९६९ ते २०१९ या ५० वर्षांची आकडेवारी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यात मे महिन्यात तब्बल १०७ वेळा नागपूरकरांनी उष्णतेची लाट सोसली आहे. यामध्ये ९० दिवसांसह चंद्रपूर दुसऱ्या, तर यवतमाळ ८० दिवसांसह तिसऱ्या स्थानावर आहे. काँक्रिटीकरणामुळे या उष्णतेच्या लाटेचा अधिक त्रास होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
(हेही वाचा- ‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर!)
उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा सरासरी ४० ते ४३ अंशांच्या वर आहे. त्यात मराठवाडा, विदर्भात ४३ ते ४६ अंशांच्या वर जाताना दिसत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. तज्ञांच्या मते, सिमेंट काँक्रिटीकरणामुळे सायंकाळी थंड होणारी शहरे आता थंड होत नाहीत. तापमानाच्या उच्चांकामुळे नैसर्गिकरित्या शहर थंड करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. एखाद्या ठिकाणचे तापमान मैदानी भागात ४० अंश सेल्सिअस आणि किनारी भागात ३७ अंश सेल्सिअस व टेकड्यांमध्ये ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते, तेव्हा उष्णतेची लाट येते. हवामान खाते उष्णतेची लाट घोषित करते, तेव्हा त्या ठिकाणी तापमान त्या दिवशीच्या सामान्य तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक असते. यावर्षी मार्च महिन्यापासूनच देशात उष्णतेच्या लाटांची सुरुवात झाली.
देशात उष्णतेच्या लाटेचा हंगाम सुरू
नागपूर शहराने गेल्या अनेक दशकातील सर्वांत उष्ण एप्रिल महिना अनुभवला आणि मे महिन्यात देखील ही उष्णता कायम आहे. मार्च महिन्यात पश्चिम राजस्थानमध्ये अँटीसायक्लोन आणि पाऊस-वाहणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या अनुपस्थितीमुळे देशात उष्णतेच्या लाटेचा हंगाम सुरू झाला होता. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत नागपुरात आतापर्यंत तीन दिवस उष्णतेची लाट आली आणि सलग आठ दिवस कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.
Join Our WhatsApp Community