नायर रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांवरील उपचारात दिरंगाईच्या प्रकाराबाबत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. डॉक्टरांमध्ये आपण देवाला पाहतो, परंतु रुग्ण वेदनेने विव्हळत असतानाही ते निर्विकारपणे बसून होते. त्यामुळे अशा डॉक्टर आणि नर्सना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच सेवेमध्ये राहण्याचा अधिकारच नसून यापुढे महापालिकेच्या सेवेत कधीच घेऊ नये, अशी मागणी समितीने केली. या मुलाचा बळीच या रुग्णालयाने घेतलेला असून या प्रकाराची गंभीर दखल घेत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करताना डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंदणीच रद्द करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली आहे.
कोविड काळातील कामावर काळा डाग
वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटामध्ये भाजलेल्या रुग्णांवर नायर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात दिरंगाई झाली. जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये नर्स आणि दोन डॉक्टर केवळ बसून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी समितीमध्ये झटपट सभा तहकुबी मांडली होती. या सभेमध्ये भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सभा तहकुबी मांडण्याचे पत्र समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना दिले होते. पण त्याआधीच सत्ताधारी पक्षाने झटपट सभा तहकुबी मांडली. यामध्ये राऊत यांनी एक दिवस आधीच गॅसमधून गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्याची तक्रारही त्यांनी केली होती, असे सांगत या दुघर्टनेनंतर विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी त्यांना पोद्दार रुग्णालयात प्रथम दाखल केले असल्याची माहिती दिली. हा प्रकार गंभीर असून कोविड काळात केलेल्या चांगल्या कामावर या घटनेने काळा डाग पडला. त्यामुळे सर्व अधिष्ठाता आणि प्रमुख अधिकारी यांची एक बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्याची सूचना त्यांनी केली.
(हेही वाचा खबरदार! वाहतूक पोलिसांसोबत उद्धटपणे वागाल तर …)
नुकसान भरपाई गॅस कंपनी आणि डॉक्टरांच्या मानधनातून द्यावी
याला पाठिंबा देताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ज्या गोल्डन अवर्समध्ये उपचार व्हायला पाहिजे, त्यावेळेत व्हायला हवे, तसे झालेले नाही. त्यामुळे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून जेलमध्येच टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या रुग्णांवर प्राथमिक उपचारही करण्यात आले नाही, असे सांगत हा प्रकार अमानवीय असल्याचे सांगितले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली, तरी ही कारवाई पुरेशी नसून हे डॉक्टर पुन्हा महापालिकेच्या सेवेत दिसता कामा नये, अशी मागणी केली. वरवरचा मुलामा लावणे बंद करा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करा, अशी मागणी केली. तसेच या मृत बाळाच्या नातेवाईकाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जावी, असे सांगितले. आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल यांनी हा प्रकार लाजीरवाणा असल्याचे सांगत या प्रकाराबद्दल डॉक्टरांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता, असे सांगितले. आज एकही बर्न वार्ड सुरु नसून त्या वॉर्डाचा वापर भंगार सामानासाठी केला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे जर नुकसान भरपाई द्यायची असेल, तर महापालिकेच्या तिजोरीतून न देता गॅस कंपनी आणि डॉक्टरांच्या मानधनातून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंदणीच रद्द करण्यात यावे
भाजपचे विनोद मिश्रा यांनी आपण ४५ मिनिटांच्या गोल्डन अवर्समध्ये उपचार करू शकलो नाही, हे आता रुग्णालय मान्य करू लागले आहे. परंतु त्या घटनेनंतर ते डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि तत्परतेत कोणताही बदल झालेला दिसून आला नसल्याचे सांगितले. तर शिवसेनेचे संजय घाडी यांनी प्रत्येक रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यास येथील सिस्टीममध्ये सुधारली जाईल, असे सांगितले. तर भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी डॉक्टरांच्या ३०-३० तासांच्या कामाबाबत लक्ष वेधून एकप्रकारे उपचारात दिरंगाई करत त्या रुग्णांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केल्याचा आरोप केला. त्यामुळे या बेदरकार डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंदणीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्यामुळे त्यांना आयुष्यभर पश्चाताप होईल, असे सांगितले.
आरोग्य सेवेला काळीमा फासण्याचा हा प्रकार
यावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तो व्हिडिओ बघण्याचे धाड कुणाचे होत नव्हते, उलट त्यावेळी तिथे बसलेल्या डॉक्टरांना पाहून लोकांचा संताप अधिकच वाढला होता, त्यामुळे एकप्रकारे महापालिकेच्या आरोग्य सेवेला काळीमा फासण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत यशवंत जाधव यांनी प्रशासनाने तेल लावलेल्या पैलवानासारखे खुलासे करू नये असे बजावले. तर ठोस कारवाई करावी तसेच या डॉक्टरांना नागरिकांसह लोकप्रतिनिधींशी कशाप्रकारे वागायचे याचेही प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी केली. यावर प्रशासनाने खुलासा करताना प्रत्यक्ष अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी उपचार आणि माणुसकीमधील बेजबाबदारपणा आणि संवेदनशीलता बाजुला ठेऊन केला प्रकार असल्याचे सांगत याची त्रिसदस्यीय चौकशी केली जात असल्याचे सांगितले
Join Our WhatsApp Community