अधिकाऱ्याला आधी दिला पुरस्कार, नंतर घेतला आक्षेप! नमामि चंद्रभागा प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी कारणीभूत अधिकाऱ्याची काय आहे कथा?

102

मोठ्या थाटामाटात जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने दिशादर्शक प्रकल्प म्हणून जाहीर केलेल्या नमामि चंद्रभागा या प्रकल्पाची सद्यस्थिती अद्यापही हेलखावे खात आहे. या प्रकल्पाची कोणतीही कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. गेल्या ५ जून रोजी पर्यावरणदिनानिमित्ताने सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त म्हणून सत्कार केलेल्या सौरभ राव यांच्यावरच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे. ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प यशस्वी अंमलात आणण्याची जबाबदारी सौरभ यांच्या खांद्यावर असताना अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. नमामि चंद्रभागा या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

२०१६ साली नमामि चंद्रभागा प्रकल्पाचा अध्यादेश प्रसिद्ध झाला

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सौरभ राव यांचा सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त म्हणून सत्कार केला होता. राव यांच्या अध्यक्षतेखाली नमामि चंद्रभागा प्रकल्पाची उभारणी पूर्ण झालेली नसताना पुरस्कार कोणत्या कारणासाठी दिला गेला, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. जलप्रदूषामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांचे जीवन धोक्यात आलेले असताना नमामि चंद्रभागा हा प्रकल्प जाहीर झाल्यापासून पुणे विभागीय आयुक्त पदावर दोन जणांनी काम पाहिले आहे. सध्याच्या राज्य पर्यावरण असेसमेंट समितीच्या अध्यक्षपदावर असलेल्या दीपक म्हैसकर यांनी नमामि चंद्रभागा हा प्रकल्प जाहीर केला, त्यांनी पुणे विभागीय आयुक्त पदाचे काम पाहिले होते. २०१६ साली नमामि चंद्रभागा या प्रकल्पाचा सरकारी अध्यादेश प्रसिद्ध झाला होता.

(हेही वाचा ट्रिपल तलाकनंतर आता मुस्लिम महिलांनी ‘या’ तलाकलाही केला विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल)

नदी किना-यावरील स्थानिक जनतेच्या लोकांचे जीवन धोक्यात 

२०१९ सालापासून पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित २९३ ग्रामपंचायतींना केवळ कागदोपत्री प्रकल्पाची आठवण करुन देत आहे. या ग्रामपंचायतींना आतापर्यंत किती वेळा दंडात्मक वसुलीच्या नोटीस दिल्या याबाबतची आकडेवारी आणि दंडाची एकूण रक्कम दोन-तीन दिवसांत आम्ही सांगू, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जलप्रदूषण विभागाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांनी दिली. प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून माहिती घेऊन कळवले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ए शिनगारे यांनी कळवले होते, परंतु त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नदी किना-यावरील स्थानिक जनतेच्या लोकांचे जीवन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे नमामि चंद्रभागा प्रकल्पावर दिरंगाई करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.