पर्यावरण प्रेमींसाठी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून आनंदाची बातमी आहे. नामिबियातील ‘सिया’ या मादी चित्त्याने ४ पिल्लांना जन्म दिला. मादी चित्ता आणि पिल्ले सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. राष्ट्रीय उद्यानातील विशेष टीम मादी चित्ता आणि तिच्या पिल्लांची काळजी घेत आहे.
चित्ता संवर्धन प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की, ‘कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते त्यांच्या नवीन वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असल्याचे सकारात्मक लक्षण आहे.’ ७२व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश असलेले ८ चित्ते सोडले होते. अलीकडेच एक मादी चित्ता ‘साशा’चा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
नामिबियातील साशा ही मादी चित्ता सोमवारी, २७ मार्च रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मृतावस्थेत आढळून आली. मादी चित्ताची किडनी निकामी झाली होती. या बातमीने देशात चित्त्यांचे पुनर्वसन करू इच्छिणाऱ्या वन्यजीवप्रेमींना धक्का बसला. मात्र, चार पिल्ले एकत्र जन्माला आल्यानंतर आता चित्त्यांच्या देशात पुन्हा स्थायिक होण्याच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला नामिबियातून आठ चित्ते आणून कुनो इथे सोडण्यात आले होते, तर १८ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची आणखी एक तुकडी भारतात आणण्यात आली होती. या १२ चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच माद्या होत्या. या सर्व चित्त्यांसह सध्या कुनोमधील चित्त्यांची संख्या २३ झाली आहे.
(हेही वाचा – नामिबियातून भारतात आलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू!)
Join Our WhatsApp Community