जन्माला आल्यापासून एकदाही रेल्वेने प्रवास केला नाही, असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. दात न आलेलं नवजात बाळ असो किंवा दात पडून तोंडाचं बोळकं झालेले वयोवृद्ध असोत, सर्वच जण रेल्वेतून प्रवास करताना आपल्याला दिसतात. लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या या प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त रोज प्रवास करणा-या सर्वसामान्यांसाठी तर लोकल हे दुसरं घरंच आहे.
आज लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. पण जेव्हा पहिल्यांदा भारतात रेल्वे धावली, तेव्हा त्यातून प्रवास करणारे पहिले भारतीय फार कमी जणांना माहीत आहेत. आजपासून तब्बल 169 वर्षांपूर्वी पहिल्या भारतीय रेल्वेतून प्रवास करण्याचा मान मिळालेले पहिले भारतीय होते, जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे म्हणजेच मुंबईचे नाना शंकरशेठ.
(हेही वाचाः रेल्वे प्रवासाच्या धडपडीसंगे युद्ध आमुचे सुरू… जिंकू किंवा मरू…)
रेल्वेच्या वटवृक्षाचे ‘बिजारोपण’
16 एप्रिल 1853 रोजी पहिली भारतीय रेल्वे ठाणे ते बोरीबंदर(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या मार्गावर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांसह 14 डब्यांच्या या झुकझुक गाडीने हे 34 किमी. अंतर पार केले. त्यावेळी या ट्रेनमध्ये अनेक नामांकित ब्रिटीश अधिका-यांसह नाना शंकरशेठ हे भारतीय सुद्धा होते. नानांनी केवळ या रेल्वेतून प्रवासच केला नाही, तर भारतीय रेल्वेचा कधीही न थांबणारा प्रवास सुरू करण्यात नानांचं फार मोठं योगदान आहे.
भारतीय रेल्वेच्या विस्तारासाठी नानांनी आपली अमाप संपत्ती आणि सोन्यासारखी अमूल्य जमीन त्यावेळेस दान म्हणून दिली. त्यामुळे आज एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपल्या कक्षा विस्तारणा-या भारतीय रेल्वेचं बीज नानांनी पेरलं होतं, असं म्हणता येईल.
कोण आहेत नाना शंकरशेठ?
जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव. नाना शंकरशेठ याच टोपण नावाने त्यांना लोक ओळखत असत. त्यांचा वडिलोपार्जित जवाहि-याचा व्यवसाय होता. एकेकाळी अर्ध्या मुंबईचे मालक म्हणून त्यांना ओळखले जात असे. नानांनी त्या काळात भारतात समाजसुधारणेचं मोठं कार्य केलं. मुंबईचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख होती. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांत नानांनी त्या काळी उल्लेखनीय असं कार्य केलं.
(हेही वाचाः व्हॉट्सअपवर कसं मिळवाल मेट्रोचं तिकीट?)
‘आधुनिक भारताचे शिल्पकार’
भारतातील विशेषतः त्या काळच्या मुंबई प्रांतातील समाजसुधारणेच्या कार्याचा नारळ नानांनी वाढवला. त्यामुळेच ‘लोकाग्रणीतील पहिले’ अशी त्यांची ख्याती होती. बुद्धी, विद्वत्ता आणि कर्तृत्व यांचा ते महामेरू होते. त्यांच्या उत्तुंग अशा कार्याचा अनेक इतिहासकार आणि साहित्यिकांनी गौरव केला आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे म्हटले आहे.
इंग्रजांवरही नानांचा चांगलाच वचक होता. ब्रिटीश सरकारने त्यांना Justice of the Peace(J.P.) ही पदवी बहाल केली होती. जनतेला न्याय देण्यासाठी राजाने नेमलेला प्रतिनिधी असा या पदवीचा अर्थ होता. आपल्या या पदाचा उपयोग करुन नानांनी जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. नानांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असेही नामाभिधान देण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाला नानांचा विसर
आज भारतीय रेल्वेचे जाळे चांगलेच विस्तारत आहे. काळानुरुप रेल्वेमध्ये असंख्य बदल करण्यात येत आहेत. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. हजारो स्थानकं, करोडो प्रवासी असलेली भारतीय रेल्वे जगभरात नावाजलेली आहे.
पण तिची मुहूर्तमेढ रोवणा-या नाना शंकरशेठ यांचा रेल्वेला विसर पडल्याची खंत आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याची मागणी गेली कित्येक वर्ष करण्यात येत आहे. पण अजूनपर्यंत या मागणीला हिरवा कंदिल मिळालेला नाही.
(हेही वाचाः बेस्टच्या ‘या’ कार्डवर आता शॉपिंगही करता येणार)
नानांची इतर कार्ये
- बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना (1822)
- एल्फिन्स्टन हायस्कूल (1824) आणि एल्फिन्स्टन कॉलेज(1834)ची स्थापना
- मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या उभारणीत मोठा वाटा
- मुंबईतील पहिल्या विधी महाविद्यालयाची(Law College) स्थापना
- परकीयांप्रमाणेच भारतीयांनाही कलाविषयक शिक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील नामवंत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेसाठी पुढाकार
- मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी आणि तलावांची योजना
- भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यान (राणीची बाग) आणि ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाची सुरुवात
- मुंबईतील पहिल्या नाट्यगृहाच्या स्थापनेची ‘नांदी’
(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)
Join Our WhatsApp Community