मुंबई महापालिकेच्या विरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नारायण राणे यांचा मुंबईत जुहू येथे आदिश बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोन वेळा पाहणी करून नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. या नोटीशीविरोधात राणेंनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
( हेही वाचा : अरेरे ! ‘जागतिक वन दिनी’च ‘या’ जंगलाला लागली भीषण आग )
राणेंनी दाखल केली याचिका
आदिश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून बजावलेल्या नोटीसा रद्द कराव्या अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर २२ मार्च मंगळवारी न्यायमूर्ती एए सईद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार आहे. आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी राणेंच्या मालकीची असल्याने राणे आणि त्यांचे कुटुंबीय आदिश बंगल्यात राहत होते, परंतु ही जागा कंपनीच्या मालकीची असल्याने कंपनीमार्फत याचिका दाखल करण्यात येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
जुहू तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दांडेकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार मुंबई महापालिकेला केली होती. मात्र, यानंतर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप दांडेकर यांनी केला होता. त्यानंतर आता कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवली आहे.
Join Our WhatsApp Community