७०१ किमी लांबी, ५५ हजार ३३५ कोटींचा खर्च; वाचा समृद्धी महामार्गांची वैशिष्ट्ये

182
बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रविवारी, ११ डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास हिरवा झेंडा दाखवतील. ७०१ किमी लांबी आणि एकूण प्रकल्प ५५ हजार ३३५.३२ कोटींचा खर्च करण्यात आलेला हा हरित महामार्ग अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या प्रकल्पाला २२ डिसेंबर २०१९ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे. पूर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे व त्यापोटी मोबदला म्हणून ८००८.९७ कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी वन विभागाची एकूण ५४६ हेक्टर जमिन अधिग्रहीत करण्यात आली असून, वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. बांधकाम पॅकेज १ ते २३ चे काम ३० महिन्यांच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित होते. यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित होते. तथापि, कोविड-१९ या महामारीच्या प्रथम आणि द्वितीय लाटेमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शासन निर्णयानुसार कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार संपूर्ण प्रकल्प माहे जुलै-२०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

१३८.४७ मेगावॉट सौर उर्जा निर्मिती

  •  या प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८४ बांधकामे प्रस्तावित होती; तथापि गरजेनुसार ही बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत. त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
  • वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनी रोधक’ ची तरतूद करण्यात आली आहे.
  • तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भितीची उंची वाढवण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षणाच्या कामांसाठी एकूण ३२६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • प्रकल्पामध्ये एकूण १३८.४७ मेगावॉट सौर उर्जा निर्मिती प्राथमिक टप्प्यात होणे प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्गामध्ये एकूण ३३.६५ लक्ष लहान मोठी झाडे आणि वेली लावण्याचे नियोजन आहे.
  • त्यामध्ये दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार मोठी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीमधे झाडे लावणे, सुशोभिकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे व संपूर्ण वृक्ष लागवडीची ४ वर्षे देखभाल करणे या सर्व कामांसाठी एकूण रुपये ६९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

५२० किमीचा मार्ग खुला होणार

सद्यस्थितीत नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.