पृथ्वीच्या संरक्षणासाठी NASA ची DART मोहीम, लघुग्रहाशी होणार टक्कर! काय आहे वैशिष्ट्य?

अमेरिकेन स्पेस सेंटर NASA च्या माध्यमातून DART(Double Asteroid Redirection Test) ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अंतराळातील लघुग्रहांना टक्कर देण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली असून ती भविष्यात पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आखण्यात आल्याचे खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी हिंदुस्थान पोस्टला माहिती देताना म्हटलं आहे. ही एक ग्रह संरक्षण चाचणी असून लघुग्रहाशी टक्कर देणारी ही जगातील पहिलीच अंतराळ मोही असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय आहे मोहीम?

52 हजार वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे अश्नी पडून तिथे मोठा उल्कापात झाला आणि तिथल्या भागाचे फार मोठे नुकसान झाले. त्यावेळी तिथे लोकवस्ती नसल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पण समजा आता अणूभट्टीवर किंवा एखाद्या शहरावर असा उल्कापात झाला तर त्याचे फार मोठे दुष्परिणाम होऊन संपूर्ण शहरेच्या शहरे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे भविष्यात समजा एखादा असा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार असेल तर तो येण्याआधीच अवकाशात त्याचा मार्ग बदलण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सोमण यांनी सांगितले आहे.

कधी होणार टक्कर?

पृथ्वीजवळ असलेल्या 140 मीटरपेक्षा जास्त आकाराच्या वस्तू या धोकादायक असतात आणि त्यांच्यापैकी बरेचसे लघुग्रह आहेत. त्यामुळे या लघुग्रहांची दिशा बदलण्यासाठीची रंगीत तालीम या मोहिमेतून करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4.44 मिनिटांना ही टक्कर होणार आहे. डायमॉर्फस या लघुग्रहासोबत ही टक्कर होणार आहे. पृथ्वीपासून कोटी किलोमीटर अंतरावर ही टक्कर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here