नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे ही घटना घडली असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून ही शाई फेक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे.
समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त
गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या या घटनेनंतर विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
असा आहे संभाजी ब्रिगेडचा आरोप
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. त्याचा निषेध म्हणून कुबेरांवर शाई फेकल्याचे ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी स्वीकारली आहे. आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कोणताही पश्चाताप नाही. कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही रोटे पाटील यांनी म्हटले आहे. यासह या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
(हेही वाचा – ‘साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा पण तेथे जाऊन तरी काय करायचे?’)
संभाजी ब्रिगेडच्या दोन व्यक्तींनी कुबेरांवर शाईफेक केली. या शाई फेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘हल्ल्याची कुणकुण लागली होती’
या प्रकारानंतर नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले की, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करणार याची कुणकुण लागली होती. ते येऊन लेखी निवेदन देतील, निषेध करतील असे वाटले होते. मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ कुबेर यांना घेऊन संमेलन परिसर फिरलो. पुण्यातून 2 जण मोटरसायकलवर आले होते. काळी पावडर त्यांनी कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं आणी त्या दोघांनी काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली आहे.
Join Our WhatsApp Community