नाशिकमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनजवळच्या भागातील हरीविहार को ऑपरेटिव्ह सोसायटीत असलेल्या २१ गाळ्यांपैकी एका गाळ्यातील ड्रममध्ये मानवी अवशेष आढळले आहेत. या गाळ्यात आठ मानवी कान, मेंदू तसेच डोळे आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांना पाचारण केले असून, पोलीस तपास सुरु आहे.
२० वर्षांपासून गाळा बंद
या सोसायटीचे अध्यक्ष जहीर अब्दुल रहेमान शेख यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ६४ प्लॅटची आमची सोसायटी असून पुढील बाजूस २१ गाळे आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्या गाळ्यामधून बॅटरी तसेच इतर साहित्य चोरीला जात आहे. आमच्या सोसायटीतील काही मुले ही रविवारी दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास खेळत असताना, त्यांना एक गाळा उघडा दिसला, मुले आता गेली असता एका ड्रममधून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी तातडीने मला संपर्क केला. मी बाहेरून आल्यानंतर संबंधीत मुलांबरोबर आत गेलो असता, मला मानवी अवशेष दिसले. मी तातडीने पोलिसांना १०० नंबरवर फोन करून सर्व माहिती दिली. या गाळा मालकाचे लक्षच नाही, वीस ते बावीस वर्षांपूर्वी हा गाळा घेतलेला असून, तो मालक कधीही येत नाही. तसेच गाळ्याच्या देखभाल दुरूस्तीकडेसुध्दा त्याचे दुर्लक्ष असून सोसायटीला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षांनी दिली आहे.
( हेही वाचा: महाविकास आघाडीला घरचा आहेर! )
मेडिकल विद्यार्थी होते वास्तव्यास
या प्रकरणी गाळा मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता, मालकाच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यामध्ये वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, काही वेळातच फॉरेन्सिक टीमदेखील दाखल झाली आहे. मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवशेषांचे संकलन करतात त्याच पद्धतीचं अवयव संकलन केले असल्याचे बोलले जात आहे.