वेळीच ओळखा निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा!

128

दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्या आधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागताच गावकऱ्यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

दरड कोसळ्यापूर्वी येणारी सर्वसाधारण लक्षणे

डोंगर उतारांना तडे जाणे, तडे गेलेला भूभाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे, नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे मोठे होणे, त्यातून गढूळ पाणी येणे, विहीरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये दिसलेली लक्षणे. अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी क्षमता वाढणे, भात खाचरांना भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे, संपर्क साधणे निकामी होणे, घरांना तडे जाणे, भिंत कोसळणे, घरांच्या जमिनीखालून पाणी येणे, विहीर वाहू लागणे, बोअरिंगमधून पाणी उसळणे. अशी ही लक्षणे दरड कोसळण्यापूर्वी दिसून येतात.

अशी लक्षणे दिसून आल्यास काय करावे?

दरड कोसळण्याची लक्षणे दिसू लागल्यास गावकऱ्यांनी तातडीने धोक्यापासून दूर होण्याचा विचार करावा. जीव वाचवणे महत्वाचे आहे. हा एकमेव विचार ठेवावा. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरास सज्ज व्हा. त्याची तयारी म्हणून शेती, बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसा, औषधे यांची जोडणी करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले तसेच जनावरांना हवलण्यास प्राधान्य द्या.

दरड कोसळण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. सह्याद्री परिसर म्हणजे पर्वतमय, भूकंपप्रवण आणि भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि खडकांमधील सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमध्ये पाणी जाऊन नवीन झरे निर्माण होतात. अखेरीस अतिवृष्टीमध्ये या तड्यांपासून दरडी कोसळतात. तसेच नवीन रस्ते, रेल्वेसाठीचे खोदकाम, बोगद्यांची कामे, खाणकामासाठीचे सुरुंग, शेतीसाठी, घर बांधणीसाठीचे सपाटीकरण, जंगलतोड यामुळेही दरडी कोसळतात.

दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, ती रोखण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. दरडी थांबण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. डोंगर भागात अतिक्रमण करू नका, सापटीकरण टाळावे. डोंगर उतारावर बांबू सारख्या वृक्षांची लागवड करणे. पाण्याचा निचरा लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे.

– हेमंतकुमार चव्हाण, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.