राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
दिघा येथील व्हिडिओ पार्लरच्या मालकाकडून त्याने खंडणी मागितली होती. या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य सूत्रधार हा राष्ट्रवादी युवा आघाडीचा शहर अध्यक्ष अन्नू आंग्रे आहे. तर अन्नू आंग्रे याचा भाऊ राहुल आंग्रे याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपींमध्ये प्रवीण पुजारी, मंगेश टेमकर, रोशन नाईक, रुराज पटेना आणि परेश भोई अशी नावे आहेत.

अन्नू आंग्रे सराईत गुन्हेगार 

अन्नू आंग्रे हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी त्याला एमपीडीए,  तसेच मोक्का कायद्याखालीही अटक करण्यात आली होती. खंडणीचा गुन्हा १९ नोव्हेंबर रोजी घडला होता, मात्र सोमवारी या प्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पवन मेलगडे यांनी तक्रार केली. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे राहुल आंग्रे याने आधी तक्रारदाराला भेटून अन्नू आंग्रे याला भेटण्यास दबाव टाकला. मात्र तक्रारदाराने नकार देताच त्याला मारहाण केली, त्यानंतर राहुल आंग्रे हा ४०-५० जणांना घेऊन आला आणि त्याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here