४०० फूट दरीत मारली उडी अन्…

162

नवी मुंबई येथील एका तरुणाने शनिवारी सायंकाळी कसारा घाटातील ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरूणाने इतके टोकाचे पाऊल उचलल्यानंतर देखील हा तरूण सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या उंचावरून उडी मारूनही हा तरूण बचावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, इगतपुरी पोलीस आणि स्थानिकांनी त्याला तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरीतून जखमी अवस्थेत बाहेर काढले.

काय घडला प्रकार

नवी मुंबई येथील या तरुणाचे नाव जगदीश नाना पाटील (वय २७) असे आहे. घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंटदरीजवळ तो फोटो काढण्याच्या बहाण्याने गेला. त्यानंतर अचानक त्याने दरीत उडी घेतली. एका रिक्षाचालकाने हे बघितले. या रिक्षाचालकाने ही घटना पाहताच तत्काळ इगतपुरी पोलिसांना कळवले. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक हॉटेल व्यावसायिक महेश शिरोळे यांना सोबत घेऊन खोल दरीत उतरून पाहणी केली. तेव्हा हा तरुण जिवंत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्वरित कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रामध्ये बेवड्यांचं सरकार आलं आहे, फडणवीसांचा गंभीर आरोप)

…आणि त्याला सुखरूप बाहेर काढले

शाम धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज मोरे, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, धर्मेंद्र ठाकूर यांनी स्थानिक ग्रामस्थ महेश शिरोळे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन मुकणे, सचिन बेंडकुळे, आदींच्या मदतीने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ८.३० वाजता त्याला सुखरूप बाहेर काढले. असेही सांगितले जात आहे की, जखमी तरुणास महामार्ग पोलीस घोटी केंद्र यांच्या रुग्णवाहिकेतून टीमला इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला जास्त मार लागला असल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.