मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीचे छापे, तिघांना अटक

या सर्व अंमली पदार्थांच्या धंद्यात दोन महिलांची महत्वाची भूमिका समोर आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील तीन विविध परिसरांत केलेल्या कारवाईत एक कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. कुर्ला, वांद्रे आणि बीकेसी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व अंमली पदार्थांच्या धंद्यात दोन महिलांची महत्वाची भूमिका समोर आली असून, त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दोघांना अटक

शाहनवाज शाहिद खान आणि आलाम नईम खान आणि रवी अरहान मेमन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी कुर्ला एलबीएस, बोहरी कब्रस्थान परीघ खाडी या ठिकाणी छापा टाकून, ५६ ग्राम एमडी आणि ४ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी शाहनवाज शाहिद खान आणि आलाम नईम खान या दोघांना अटक करण्यात आली.

(हेही वाचाः टोळी करत होती इको कारच्या सायलेन्सरची चोरी! कारण त्यातून मिळत होतं…)

एवढा ऐवज जप्त

या दोघांच्या चौकशीनंतर अंमली पदार्थाच्या धंद्यात वांद्रे पश्चिम येथे राहणाऱ्या एका महिलेचा सहभाग असल्याची माहिती मिळताच, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बीकेसी येथे या महिलेच्या घरावर छापा टाकून, ५३.८ ग्राम एमडी , ७३.७२ लाखाची रोख रक्कम आणि ५८५.५ ग्राम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे २९.४ लाख) जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरू असतानाच या संबंधी रवी मेमन या अंमली पदार्थ विक्रेत्याला बीकेसी भारत नगर येथून सोमवारी पहाटे अटक करण्यात आली.

लहान मुलांचा होतो वापर

अटक करण्यात आलेल्या टोळीत दोन महिलांचा समावेश असून, या महिलेचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ही टोळी लहान मुलांना ड्रग्सच्या आहारी लोटून त्यांच्याकडून ड्रग्स पोहोचवण्याचे काम करत होती, असा संशय एनसीबीला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः भररस्त्यात वकीलावर जीवघेणा हल्ला, कायदा सुवस्थेचे धिंडवडे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here