ड्रग्स भरून क्रूझ निघाली मुंबई टू गोवा, पण…

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे सुटणाऱ्या क्रूझमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती.

मुंबई बंदरातून गोवा येथे निघालेल्या एका क्रूझवर एनसीबीने शनिवारी खोल समुद्रात छापा टाकला, तेव्हा क्रूझवर चक्क रेव्ह पार्टी सुरु असल्याचे समोर आले. या कारवाईत एनसीबीने अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बॉलिवूडचे कलाकार बरेच असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त केला असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

मुंबई ते गोवा होणार होती रेव्ह पार्टी

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे सुटणाऱ्या क्रूझमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती. तसेच मुंबई बंदरातून क्रूझ निघाल्यानंतर त्यामध्ये पार्टी सुरू होणार होती. एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह या क्रूझवर पाळत ठेवून होते. क्रूझ मुंबई बंदरातून गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर पार्टी सुरू होताच एनसीबीच्या पथकाने भर समुद्रात असणाऱ्या क्रूझच्या एका मजल्यावर छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेव्हपार्टी सुरू असल्याचे आढळून आले.

(हेही वाचा : क्लीन अप मार्शलच्या नाड्या महापालिका आवळणार, घेणार ‘हा’ निर्णय)

एका सुपरस्टारचा मुलगाही अडकला 

एनसीबीने क्रूझवर असणाऱ्या क्रू मेंबरला आपली ओळख दाखवून पार्टीत सहभागी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन या पार्टीसाठी ड्रग्स पुरवठा करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान एनसीबीने या क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या रेव्ह पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकार मोठ्या प्रमाणात सहभागी होते. एका सुपरस्टारचा मुलगाही अडकला आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

पुन्हा ड्रग्स भरून मुंबईत परतणार होते!

ही क्रूझ शनिवारी मुंबई बंदरातून निघून गोवा येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रूझवर ड्रग्स आणि रेव्ह पार्टीसाठी लागणारे ड्रग्स घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती व सोमवारी पहाटे ही क्रूझ मुंबई बंदरात दाखल होणार होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here