दाऊदचा भाऊ एनसीबीच्या कोठडीत! ड्रग्सचे अंडरवर्ल्ड कनेक्शन बाहेर येणार?

इक्बालच्या चौकशीत महत्वाची माहिती आणि ड्रग्सचे अंडरवर्ल्ड कनेक्शन बाहेर येण्याची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे.

89

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकात असताना प्रदीप शर्मा यांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचा बुधवारी एनसीबीने ठाणे तुरुंगातून ताबा घेऊन त्याला अटक केली आहे. इक्बाल कासकर याला कशिमीरा येथून आलेल्या एका ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ड्रग्सचा पैसा दहशतवादी कृत्य, तसेच अंडरवर्ल्डसाठी वापरला जात असल्याचा संशय एनसीबीला असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

१५ किलो चरस आणले मुंबईत

एनसीबीने एका आठवड्यात चरस तस्करीची दोन मोठी रॅकेट मुंबईत पकडली आहेत. याप्रकरणी गुरुमित सिंग आणि रवींद्र सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे मूळचे पंजाब राज्यातील असून, या दोघांनी जम्मू-काश्मीर येथून दोन मोटारसायकलवरुन सुमारे १५ किलो चरस मुंबईत आणले होते. मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीत कप्पे तयार करुन हॅचर्स त्यात लपवून आणण्यात आले होते.

(हेही वाचाः कोरोनामुळे नक्षलवादी चळवळीला भगदाड! आता नक्षलीनेता हरिभूषणचा मृत्यू!)

ड्रग्सचे अंडरवर्ल्ड कनेक्शन बाहेर येणार?

दोघांच्या चौकशीत या चरस तस्करीत अंडरवर्ल्ड संबंधी महत्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढे आले असून, ड्रग्स तस्करीतून मिळणारा पैसा टेरर फंडिंग आणि अंडरवर्ल्डसाठी वापरला जात असल्याचा संशय एनसीबीला आहे. या अनुषंगाने इक्बाल कासकर याच्याकडे चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने विनंती मान्य करून इक्बालचा ताबा एनसीबीला देण्यास मंजुरी दिली होती. बुधवारी एनसीबीने प्रोडक्शन वॉरंट मार्फत ठाणे तरुंगातून इक्बालचा ताबा घेऊन त्याला अटक केली आहे. इक्बालच्या चौकशीत महत्वाची माहिती आणि ड्रग्सचे अंडरवर्ल्ड कनेक्शन बाहेर येण्याची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.