ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार याच्या आत्महत्येत अडचणीत आलेले ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येमध्ये देखील त्यांच्या नावाची जोरदार चर्चा ठाण्यात सुरू आहे. जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिस आणि युपीच्या पोलिसांनी एकत्र केलेल्या कारवाईत, लखनऊ येथून नुकतीच एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. त्याने युपी पोलिसांना दिलेल्या माहितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव घेतले असल्याचे, युपी पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. ठाणे पोलिसांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार देत, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
जमील-नजीब यांच्यात होते वैर
ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली होती. ही हत्या मोटारसायकल वरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. मोटारसायकवरुन निघालेल्या जमील शेख यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी मारण्यात आली होती. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. जमील शेख यांचे स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून वैर होते. जमील शेख यांच्यावर यापूर्वी देखील जीवघेणा हल्ला झाला होता आणि हा हल्ला नजीब मुल्ला यांनी केला असल्याचे जमील शेख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.
(हेही वाचाः मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या खुन्याला लखनऊमध्ये अटक! )
हल्लेखोराने घेतले नजीब यांचे नाव
जमील शेख यांच्या हत्येचा गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेने ४८ तासांत हल्लेखोरांपैकी शाहिद याला अटक केली होती. त्यानंतर ४ एप्रिल २०२१ रोजी ठाणे गुन्हे शाखा आणि युपीतील एसटीएफच्या पथकाने लखनऊ येथून दुसरा हल्लेखोर इरफान ऊर्फ राजधानीया सोनू शेख मन्सुरी(२१) याला अटक केली. इरफान हा युपी एसटीएफच्या ताब्यात असताना, त्याने तेथील पोलिसांना हत्येची कबुली देत नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या नावाचा या गुन्हयात उल्लेख केला असल्याचे, युपी पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या हत्येसाठी इरफानला २ लाख रुपये मिळाले होते. हे दोन लाख रुपये ओसामा नावाच्या व्यक्तीकडून देण्यात आले होते. ओसामा हा राबोडी परिसरात राहणारा असून, मूळचा इरफानच्या गावात राहणारा आहे. इरफानला ठाणे गुन्हे शाखेने ट्रॅन्झिस्ट रिमांड घेऊन ठाण्यात आणले आहे. त्याला ठाणे न्यायालयाने १५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा आहे नजीब मुल्ला याचा इतिहास
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे यापूर्वी अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुरज परमार यांच्या आत्महत्येत देखील नजीब मुल्ला यांचे नाव समोर आले होते. स्वतः सुरज परमार याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या डायरीत नजीब मुल्ला आणि इतर तीन नगरसेवकांची नावे लिहिली होती. ठाण्यातील एका आमदारांच्या अगदी निकटचे मानले जाणारे नजीब मुल्ला यांना आता राज्यातील राजकारणाचे वेध लागले असून, सध्या ते बड्या नेत्याच्या संपर्कात आहेत. या नेत्याचे निकटवर्तीय म्हणून नजीब मुल्ला यांनी स्वतःची ओळख तयार केली असल्याचे बोलले जात आहे. जमील शेख याच्या हत्येत नजीब मुल्ला यांच्यावर नातेवाईकांनी थेट संशय व्यक्त केला होता. तसेच जमील शेख यांच्यावर यापूर्वी झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील नजीब मुल्ला यांनीच जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला होता. मात्र नजीब मुल्ला याने हे सर्व आरोप फेटाळून लावत, माझा या घटनांशी काही संबंध नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते.
(हेही वाचाः एनआयएची नवीन चाल, कळवा रेल्वे स्थानकावर ‘सीन रिक्रिएट’!)
ठाणे पोलिसांकडून प्रतिक्रिया नाही
जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात नजीब मुल्ला यांच्यावर आरोप होऊन देखील ठाणे पोलिसांकडून त्यांची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नव्हती. तसेच युपीत पकडला गेलेल्या हल्लेखोराने देखील युपी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात नजीब मुल्ला यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर देखील अद्याप ठाणे पोलिसांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community