तुरूंगात असा उतरला नवाब मलिकांच्या मंत्रीपदाचा अहंकार

87

राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी जंग जंग पछाडले. पण तरीही त्यांना मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकारल्यामुळे आता भाजपवर टीका करण्यात येत आहे. पण याच नवाब मलिक यांनी कारागृहातील नियम पाळायला नकार दिल्याचे पहायला मिळाले होते.

मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात गेलेले मंत्री नवाब मलिक यांनी पहिल्याच दिवशी कारागृहातील काही नियम पाळण्यावरून कारागृहातील अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मलिक यांना तपासणीसाठी विवस्त्र होण्यास सांगितले असता, त्यांनी आक्षेप घेऊन कारागृहातील अधिका-यांशी वाद घातल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कारागृहातील अधिका-यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच असला कुठलाही प्रकार झाला नसल्याचे एका अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

(हेही वाचाः नशीब… राऊत काठावर वाचले, भुजबळांनीच दिली कबुली)

मलिकांनी घातला अधिका-यांशी वाद

मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर ईडी कोठडी संपताच न्यायालयाने मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मलिक यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. कारागृहातील सर्व प्रकारच्या कैद्यांसाठी असणारे नियम हे मलिक यांना लागू करण्यात आले. त्यावेळी त्यांची झडती घेण्यात आली. त्यानंतर एका खोलीत त्यांना विवस्त्र होऊन तपासणी करायची असल्याचे सांगण्यात आले असता, त्यांनी याबद्दल आक्षेप घेत अधिका-यांच्याशी वाद घातला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवाब यांनी अधिका-यांना धमकी देखील दिली, असेही बोलले जात आहे. मात्र याबाबत कारागृह प्रशासन तसेच अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला नसून, याबाबत बोलण्यास टाळले. परंतु कारागृहातील नियम सर्वांना सारखे असतात आणि ते कारागृहात पाळले जात असतात, असे एका अधिका-यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः पोलीस आयुक्तांच्या निवृत्तीच्या वाटेवर पोलिसांचे डोळे)

काय असतात कारागृहातील नियम?

कैद्यांना अथवा न्यायालयीन बंदींना कारागृहात ठेवण्यापूर्वी कारागृहातील नियमाचे पालन करावे लागते. कैदी किंवा न्यायालयीन बंदी हा सर्वसामान्य असो अथवा बडा अधिकारी, पुढारी कोणीही असो, सर्वांना कारागृहातील नियम पाळावेच लागतात.

  • एखाद्या गुन्ह्यातील अटक आरोपी हा पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जातो, त्यावेळी संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी किंवा अंमलदार हे आरोपीची वैद्यकीय तपासणी करून, त्याला कारागृहात आणतात.
  • कारागृहातील न्यायालयीन प्रक्रिया, आरोपीची तपासणी ही प्रक्रिया पार केल्यानंतर आरोपीचा ताबा कारागृह प्रशासनाकडे दिला जातो. कारागृहाच्या ताब्यात आलेल्या आरोपीची न्यायबंदी म्हणून त्याची दफ्तरीत नोंद केली जाते.
  • न्यायबंदी असलेल्या आरोपीची अंगझडती घेऊन त्याच्या जवळील वस्तू, पैसे, खाद्यपदार्थ, वस्तूंसोबत असलेले कपडे, औषधे इत्यादी हे कारागृहात प्रथम जमा केले जाते.
  • त्यानंतर बॅरेककडे जाण्यापूर्वी एका खोलीत तुरुंग रक्षक न्यायबंदी असलेल्या आरोपीला पूर्णपणे कपडे काढून त्याची तपासणी करतो. यावेळी त्याला विवस्त्र अवस्थेत दोन ते तीन वेळा उठाबशा काढण्यास सांगितले जाते.
  • त्याच्या अंगावर कुठे घाव आहे, व्रण आहे का, याची तपासणी करून व्यवस्थित खात्री झाल्यानंतर त्याला कपडे घालून एका ठिकाणी थांबवत, त्याच्या सोबत असलेले वापरायचे कपडे तपासणी करून त्याला बॅरेककडे पाठवले जाते.
  • त्याच्या जवळील पैशाची नोंद ठेवून ते कारागृहात जमा करून तसेच त्याची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ठरलेल्या वेळेत दिले जाते.
  • बॅरेककडे जाण्यापूर्वी न्यायबंदीला आणखी एक प्रक्रिया पार करावी लागते. कारागृहात आलेल्या सर्व न्यायबंदी,कैदी यांना एका कॉमन बॅरेकमध्ये ठेवले जाते, त्या ठिकाणी त्याच्या हातावर तात्पुरता क्रमांकाचा गोल आकाराचा ठप्पा मारला जातो.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात प्रथम कारागृहातील न्हावी (कैदीच असतो) न्यायबंदीचे केस बारीक करतो, त्याची नखे तपासली जातात.

(हेही वाचाः पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल, फडणवीसांच्या विधानाने खळबळ)

  • ही प्रकिया पार पडल्यानंतर न्यायबंदीची माहिती,त्याचे छायाचित्रे काढून त्याला न्यायबंदी क्रमांकासह एक ओळखपत्र दिले जाते. तुरुंग अधीक्षक या न्यायबंदीची ओळख परेड घेत असताना, न्यायबंदीला शर्ट काढून अधीक्षक यांच्यासमोर उभे राहून स्वतःची माहिती द्यावी लागते.
  • तात्पुरत्या बॅरेकमध्ये गुन्ह्याचे स्वरूप बघून न्यायबंदी यांची विभागणी करून त्यांना वेगवेगळ्या सर्कलमध्ये असलेल्या बॅरेकमध्ये पाठवले जाते.
  • कारागृहात कैद्यांसाठी असलेल्या कँटीनमध्ये तेलापासून कपड्यांपर्यंत, तसेच खाण्यापासून पेयापर्यंत सर्वच वस्तू मिळतात, त्यासाठी प्रत्येक कैद्याला खर्चाची मर्यादा दिली जाते.
  • प्रत्येक कैदी हा महिन्यातून केवळ साडे चार हजार रुपये खर्च करू शकतो. कारागृहात खर्च करण्यासाठी अंडर ट्रायल (कच्चे कैदी) यांना ही खर्चाची रक्कम घरून मनी ऑर्डर स्वरूपात मागवली जाते. ही रक्कम कारागृह प्रशासनाच्या ताब्यात ठेवून त्यातून कॅन्टीनचा खर्च वजा केला जातो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.