भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीनंतरच राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
काय म्हणाले मलिक?
दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक गोष्ट रचण्यात आली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
(हेही वाचाः आधी चोर्या, आता बहाणे! दरेकरांचे मलिकांना उत्तर)
येत्या काळात जनता उत्तर देईल
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपाचे हे राजकारण जनता बघत असून, येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community