राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, सावरकर दर्शन प्रतिष्ठानची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी राज्यकर्त्या ब्रिटिशांकडे क्षमायाचना करून अंदमानच्या कारागृहातून स्वतःची सुटका करून घेतली, ते घाबरट होते, इंग्रज सरकारकडून निवृत्ती वेतन घेत होते आणि काँग्रेस विरोधात त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती, असे असत्य, आधाररहित आणि दुष्टबुद्धीने केलेल्या आरोपांसाठी काँग्रेसचे भूतपूर्व अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान सदस्य राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने केली आहे.

स्वातंत्र्याच्या सध्याच्या अमृत महोत्सवी वर्षात चळवळीतील लहानमोठ्या घडामोडींविषयी नवनवीन माहिती उजेडात येत आहे. भारताची अखंडता आणि एकात्मता राखण्यात काँग्रेस पक्षाला आलेले दारुण अपयश आणि जागतिक आतंकवादाचे एक महत्वाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानची निर्मिती करण्यात घडलेला काँग्रेसचा महत्वपूर्ण आणि निर्लज्ज सहभाग लोकांच्या यथातथ्य स्वरूपात लक्षात येण्याआधी अखंड भारतासाठी जिवाचे रान करणाऱ्या आणि पाकिस्तान निर्मितीला कडाडून विरोध करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘खलनायक’ म्हणून नव्याने आरोपित करण्याचे कारस्थान काँग्रेस संस्कृतीचे म्होरके रचित असून राहुल गांधी यांचे वक्तव्य त्या कटकारस्थानाचा भाग असावेस असा संशय प्रतिष्ठानाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील स्थानबद्धता या संबंधात जी सरकारी आणि बिनसरकारी कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यावरून ब्रिटिश सावरकरांना आपल्या साम्राज्याला निर्माण झालेला सर्वात मोठा धोकादायक शत्रू समजत होते. भारत स्वतंत्र झाल्यावर दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार हे स्वतंत्र भारताचे पहिले सरकार असल्याने त्याच्या चुकांकडे सद्बुद्धीने दुर्लक्ष करून त्याला संपूर्ण सहकार्य करणे हे प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य समजले पाहिजे, असे आवाहन सावरकरांनी केले होते.

(हेही वाचा – राज्यातील सरकार लवकर घालवले नाहीतर राज्याचे पाच तुकडे होणार; राऊतांची सरकारवर जोरदार टीका)

वीर सावरकरांवर असे खोटे नाटे आरोप करून राहुल गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा घोर अपमान केला असून स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाविषयी घोर अज्ञान दाखविले आहे. आपल्या अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे लाजिरवाणे प्रदर्शन राहुल गांधींनी केले असल्याचे सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांनी म्हटले आहे तर राहुल गांधींच्या या कृतीचा त्यांच्याकडून तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here