जेव्हा एखादं लहान मूल या जगात दाखल होतं, तेव्हा त्याला जन्माचा दाखला मिळेपर्यंत त्याची सरकार दरबारी नोंद होत नाही. अगदी शालेय शिक्षणापासून पुढील सर्वच टप्प्यांवर जन्माचा दाखला ही व्यक्तीची ओळख पटवून देते. त्यामुळे हा दाखला जर का मिळाला नाही तर आपला जन्म वायाचं जाणार नाही का?
आता पंतप्रधानांना तीन महिने त्यांच्या जन्माचा दाखलाच मिळत नव्हता, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. पण मित्रों… कटू असलं तरी ते सत्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील ‘पंतप्रधानाला’त्याच्या जन्माचा दाखला मिळत नव्हता. अखेर तीन महिन्यांनी तो मिळाला आणि त्याचे ‘अच्छे दिन’सुरू झाले.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी खुर्चीसाठी रश्मी ठाकरेंशी केली गद्दारी! सोमय्यांचा आरोप)
का मिळाला नाही जन्माचा दाखला?
जन्माला आलेल्या बाळाला आधी त्याचं नाव मिळतं आणि मग त्याच्या कर्तृत्वाने त्याला पदव्या आणि पदं मिळतात. पण उमरगा तालुक्यातील दत्ता चौधरी यांनी जन्माला आल्या आल्या आपल्या दोन्ही मुलांची नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपती ठेऊन, त्यांना नावाऐवजी पदंच देऊन टाकली. त्यांचा धाकटा मुलगा पंतप्रधान याला जन्म दाखला मिळावा यासाठी त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य विभागात 27 नोव्हेंबर 2021 रोजी अर्ज केला. मात्र पंतप्रधान या नावाचा जन्म दाखला कसा द्यायचा असा प्रश्न पडल्याने, आरोग्य विभागाने दाखला देण्यास नकार दिला.
…अखेर पंतप्रधानाचा जन्म सार्थक झाला
पंतप्रधान हे सांविधानिक पदनाम असल्यामुळे त्या नावाचा जन्म दाखला कसा द्यायचा, याबाबतच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागाने सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे 1 डिसेंबर 2021 रोजी पत्र पाठवले. अखेर तीन महिने उलटून गेल्यानंतर गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानाला जन्माचा दाखला मिळाला आणि त्याचा जन्म सार्थक झाला.
(हेही वाचाः अवैध गर्भपात रोखण्यासाठी आता बक्षीसं!)
माझा पहिला मुलगा राष्ट्रपती याचा 19 जून 2020 रोजी जन्म झाला. त्याच्या जन्माचा दाखला मला मिळाला व आम्ही त्याचे आधारकार्ड देखील बनवून घेतले. पण पंतप्रधान नावाने जन्म दाखला मिळण्यास नकार दिल्याने मी कायदेशीर संमती मिळेपर्यंत वाट पाहिली पण पाठपुरावा काही सोडला नाही. पण अखेर गुरुवारी मला आरोग्य विभागाने पंतप्रधानाच्या जन्माचा दाखला देऊन त्याची सरकार दरबारी नोंद घेतली.
-दत्ता चौधरी, पालक