मुदतपूर्व जन्माला आलेल्या केवळ 800 ग्रॅमच्या मुलीला नवे जीवनदान देण्यास कामा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. 110 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मुलीचे प्राण वाचले अन् डॉक्टर आणि मुलीच्या आईने सुटकेचा निश्वास सोडला.
कुलाबा येथील रहिवासी असलेल्या ज्योती दुबे यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 13 मे रोजी ज्योती यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. ज्योती यांना मुदतपूर्व प्रसुती झाली होती. त्या दैनंदिन तपासण्यासाठी 2 मे रोजी कामा रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बाळाला मातीच्या शरीरात योग्य रक्तपुरवठा होत नव्हता. बाळाची वाढ थांबल्याने डॉक्टरांनी ज्योती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेतले.
बाळाची स्थिती पाहता मुदतपूर्व प्रसूती केली जाईल, याची कल्पनाही डॉक्टरांनी ज्योती यांना दिली. डॉक्टरांनी तब्बल 11 दिवस ज्योती यांना निरीक्षणाखाली ठेवले. 13 मे रोजी ज्योती यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. जन्मतच बाळाचे वजन कमी होते. मुलीचे फुफ्फुस पूर्णपणे विकसित झाले नव्हते, परिणामी श्वास घेता येईना. बाळाला पहिले 12 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. त्यानंतर बाळ तब्बल एक महिना ऑक्सिजनवर होते.
(हेही वाचा-Monsoon Update : राज्यात पावसाचे पुनरागमन; पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज)
कामा रुग्णालयाच्या बालरोगतज्ञ डॉक्टर श्रुती ढाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मतः मुलीची प्रकृती फारच गंभीर होती. डॉक्टरांचा परिचारिकांनीही मुलीला वाचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मुलीला दूध रक्तपेढीतून दूध देण्यापासून ते कांगारू केअर पर्यंत परिचारिका धडपडत होत्या. मुलीच्या शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी माता, डॉक्टर, परिचारिका सर्वजण प्रयत्न करत होते. अखेरीस मुलीचे वजन 800 ग्रॅमवरून 1 किलो 816 ग्रॅमपर्यंत वाढले.
अखेरीस मुलीला व मुलीच्या आईला 30 ऑगस्ट रोजी डिस्चार्ज मिळाला. शनिवारी ज्योती दुबे यांनी मुलीचे नामकरण करत तिला सानवी असे नाव दिले.
Join Our WhatsApp Community