कांजूर गावातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अग्निशमन दलाकरता आरक्षित जागेवर आता नवीन अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. ही जमिन महापालिकेची असल्याने येथील सुमारे ३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर हे नवीन अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे आसपासच्या कांजूर गावात घडणाऱ्या आगीच्या वर्दीवर नियंत्रणा मिळवण्यासाठी मुलुंड एलबीएस मार्गावरील किंवा विक्रोळी अग्निशमन केंद्रातून वाहने येण्यास होणारा विलंब भविष्यात टाळता येणार आहे.
( हेही वाचा : शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती! मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम… )
मुंबईत सद्या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या वाढत्या घटनांमध्ये वेळेत घटनास्थळी पोहोचण्यास वाहतूक कोंडी अभावी विलंब होतो. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कामानंतरही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. संपूर्ण मुंबईत एकूण ३३ अग्निशमन केंद्र असून दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आणि त्याकडे जाणारे अरुंद रस्ते यामुळे प्राथमिक आग विमोचनाचे कार्य करता यावे म्हणून मिनी अग्निशमन केंद्र उभारण्यात आली आहेत. कांजूर गाव येथे अग्निशमन केंद्रा करता आरक्षित भूखंड महापालिकेच्या ताब्यात आल्याने यावर प्राथमिक सेवेचा भाग म्हणून मिनी अग्निशमन केंद्र उभारण्यात आल्यानंतर याठिकाणी आता मोठे सर्व सुविधायुक्त अग्निशमन केंद्र उभारले जात आहे. याठिकाणी दोन इमारती बांधल्या जाणार आहेत.शिवाय तळ अधिक चार मजल्याच्या ड्रिल टॉवर उभारला जाणार आहे. या दोन इमारतींमध्ये केंद्राचे कार्यालय, नियंत्रण कक्ष, लिडिंग फायर मॅन रुम, टायर रुम, मिटर रुम, डिझेल गोडाऊन, सर्व्हर रुम, उपहारगृह अधिकारी निवास सदनिका, केंद्रातील कर्मचाऱ्यांना गणवेश बदलण्यासाठी कक्ष, कर्मचारी निवास सदनिका तसेच सराव व मॉक ड्रिल करण्यासाठी ड्रील टॉवर बांधले जाणार आहेत.
केंद्र उभारण्यात येणाऱ्या विकास नियोजन रस्त्यावर सात ते आठ गाळे असून हे केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आड येत आहेत. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या तीन ते चार गाळ्यांना इतरत्र हलवून अग्निशमन केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमणाचा अडथळा दूर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी एपीआय सिव्हिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या बांधकामासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हे अग्निशमन दलाचे केंद्र हे येत्या ऑक्टोबर २०२४ पर्यंत कार्यरत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community