मुंबई, ठाण्यातील कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील उमरोली येथे ६०० कैदी क्षमता असणारे कारागृह बांधण्यात येणार आहे. या कारागृहामुळे मुंबईतील आर्थर रोड आणि ठाण्यातील कारागृहावरील कैद्यांचा भार कमी होण्यास मदत होईल.
राज्यात ९ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, १९ खुली आणि १७२ दुय्यम कारागृहे आहेत. सध्या राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. राज्यातील कारागृहांतील २३ हजार २१७ कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात सध्याच्या घडीला ४०.९४६ हून अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. यामुळेच कारागृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन कारागृह बांधण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला माहुलमध्ये नवे कारागृह बांधण्याची योजना आणि चर्चा झाली, मात्र मीरा-भाईंदर-वसई-विरार या नवीन पोलिस आयुक्तालयामुळे पालघर जिल्ह्यालाच योग्य पर्याय असल्याचे मानले जात होते. कारागृह विभागाच्या अधिका-यांची नुकतीच बैठक झाली आणि उमरोली, पालघर जिल्ह्यातील नवीन कारागृहाच्या बांधकामाबाबत चर्चा झाली आणि त्यासाठी प्रशासनाने मंजुरी दिली, असे कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे तुरुंग ६०० कैद्यांसाठी बांधण्याचा प्रस्ताव पाठवला गेला आहे आणि बांधकामासाठी निधीची प्रतीक्षा असल्याचे अधिका-याने सांगितले.