मुंबई शहरात १ नोव्हेंबर पासून चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि सह प्रवाशांना सीटबेल्ट सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र सीटबेल्ट संदर्भात अद्याप वाहन चालक आणि नागरिकांमध्ये संभ्रम असल्यामुळे पुढील दहा दिवस वाहन चालकांना दंड न आकारता वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये जनजागृती करावी असा आदेश मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून काढण्यात आला आहे.
( हेही वाचा : महापालिकेने १०० कोटींचे कंत्राट दिले, तेव्हा ‘ती’ कंपनी अस्तित्त्वातच नव्हती… )
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे सीटबेल्टचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिस्त्री यांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे त्यांचा अपघाता मृत्यू झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यासह मुंबईत सीटबेल्ट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ऑक्टोबर महिन्यात मुंबईत चारचाकी वाहन चालक आणि सह प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करून तसेच आदेश मुंबईतील प्रत्येक वाहतूक विभागाला पाठवले होते.
या आदेशात टॅक्सी व खाजगी चारचाकी वाहन चालक मालकांना १५ दिवसाची वेळ देऊन आपल्या वाहनांना सीटबेल्ट लावून घ्या, १ नोव्हेंबर पासून सीटबेल्टसक्ती लागू करण्यात येत आहे. सीटबेल्ट नसल्यास १हजार रुपयांचा दंड आकरण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. परंतु वाहन चालक,मालक,टॅक्सी चालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. मुंबईत सीलबेल्टसक्ती करण्यात येऊ नये असे अनेकांचे म्हणणे होते, तर प्रवाशांनी सीलबेल्ट न लावल्यास त्याचा भुर्दंड टॅक्सी चालकाला पडेल म्हणून टॅक्सी चालक मालक संघटनांनी सीटबेल्ट सक्तीला विरोध दर्शविला होता. १ नोव्हेबरपासून सीटबेल्ट सक्ती केल्यामुळे आदल्या दिवशी देखील वाहन चालक आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नवीन आदेश जारी जारी करण्यात आला आहे. या आदेशात सीटबेल्ट सक्ती ही १ नोव्हेंबर पासून कायम राहणार असून १० नोव्हेंबर पर्यत दंड आकारला जाणार नाही. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत वाहतूक पोलिसांनी जनजागृती करावी असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community